सप्तशृंगगडावर प्रामाणिकपणे सोने परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:47 AM2018-05-19T00:47:12+5:302018-05-19T00:47:12+5:30
कळवण : माणुसकी आणि प्रामाणिकपणा आजही समाजामध्ये आणि जनतेमध्ये जिवंत असल्याचा प्रत्यय बुधवारी भुसावळकरांना आला.
कळवण : माणुसकी आणि प्रामाणिकपणा आजही समाजामध्ये आणि जनतेमध्ये जिवंत असल्याचा प्रत्यय बुधवारी भुसावळकरांना आला. भुसावळच्या संदीप वाघोदे यांच्या पत्नीचे सप्तशृंगगडावरील भगवती प्रसाद लॉजमध्ये विसरलेले सुमारे साठ हजारांचे दागिने लॉजमालकाने प्रामाणिकपणे परत केल्याची दिलासादायक घटना सप्तशृंगगडावर घडली. भुसावळ येथील संदीप शंकर वाघोदे हे सपत्नीक सप्तशृंगगडावर भगवतीच्या दर्शनासाठी आले होते. रात्री उशीर झाल्याने सप्तशृंगगडावरील संदीप बेनके पाटील यांच्या भगवती प्रसाद लॉजमध्ये श्री. व सौ. वाघोदे यांनी मुक्काम केला. सकाळी उठून भुसावळ येथे मार्गस्थ झाले. भुसावळ येथे पोहोचल्यावर सौ. वाघोदे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र गळ्यात दिसून न आल्याने शोधाशोध केली. मात्र कुठेही आढळून आले नाही. संदीप वाघोदे यांनी संदीप बेनके पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून हकीकत कथन केली. लॉजमध्ये मंगळसूत्र राहिले का, याची चौकशी केली. बेनके पाटील यांनी वाघोदे मुक्कामी असलेल्या लॉजमधील रूममध्ये पाहणी केली असता त्यांना बाथरूममध्ये सौ. वाघोदे यांनी गळ्यातून मंगळसूत्र काढून ठेवल्याने सुस्थितीत आढळून आले. बेनके पाटील यांनी संदीप वाघोदे यांना तत्काळ भ्रमणध्वनी करून मंगळसूत्र सुस्थितीत असल्याचे सांगून सुखद धक्का देऊन आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला. संदीप बेनके पाटील यांनी भुसावळचे संदीप वाघोदे यांना दोन तोळ्याचे मंगळसूत्र साभार परत केले. यावेळी बंडू देशमुख, नाना भामरे, गणेश राऊत, गणेश सदगीर, भाऊसाहेब निकम व भाविक यावेळी उपस्थित होते.