शिक्षकांचा परतीचा प्रवास ठरला अखेरचा प्रवास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:25+5:302021-07-23T04:11:25+5:30
बुधवारी पावणे पाच वाजताच्या दरम्यान वणी येथे सर्वांनी सोबत चहा घेतला. पाऊस जोरात सुरू झाल्याने लवकर घरी पोहोचू, ...
बुधवारी पावणे पाच वाजताच्या दरम्यान वणी येथे सर्वांनी सोबत चहा घेतला. पाऊस जोरात सुरू झाल्याने लवकर घरी पोहोचू, असे म्हणत रामजी भोये, नितेश तायडे, दत्तात्रय बच्छाव, विकास शिंदे, मनोज वाघ, प्रदीप अहिरे, ए. डी. बोरसे, कारचालक सचिन पवार असे सर्व नाशिकच्या दिशेने निघाले. त्यावेळी रस्त्यात ए. झाड पडलेले दिसल्याने पावसाळ्यात वृक्षांपासून धोका असतो, त्यामुळे धोकादायक वृक्ष आणि फांद्या हटविण्याचे काम महिनाभर पहिले केले पाहिजे, असा रामजी भोये यांनी चर्चेचा विषय छेडला. दुर्दैवाने काही अंतर कापले जात नाही, तोच त्यांच्याच मोटारीवर रस्त्यालगतचे ए. वाळलेले मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुन येथील रामजी भोये, दत्तात्रय बच्छाव व नितेश तायडे या तिघा शिक्षकांचा दुर्दैवी अंत झाला. जखमी शिक्षकांनी ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधींशी संवाद साधताना वाहनातील धोकादायक वृक्षांच्या विषयावरील चर्चेला उजाळा दिला असता, त्यांना अश्रू अनावर झाले. मयत भोये व बच्छाव दिंडोरी रोडवर ओमकार नगरमध्ये तर तायडे रासबिहारी शाळेजवळ राहत होते. भोये यांच्या पश्चात पत्नी तसेच दोन मुले व मुलगी असून, तिघेही मुले शिक्षण घेत आहेत. बच्छाव यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून, त्यांच्या पत्नीदेखील शिक्षक आहेत. तायडे यांच्या पश्चात पत्नी व दीड वर्षाचा मुलगा आहे.
--इन्फो---
पंचवटीत हळहळ
सोमवारी सकाळी सर्वजण चारचाकीतून शालेय कामकाजासाठी संस्थेत गेले. त्यानंतर बारावीचा निकाल तयार करण्याचे काम करून बोर्डाकडे रवाना केले. बुधवारी नेहमीप्रमाणे घराकडचा प्रवास सुरू झाला. काही शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करायची असल्याने दुपारी सुरगाण्यात चाचणीही केली.
रामजी भोये मूळचे हरसुल करंजपाना येथील तर दत्तात्रय बच्छाव माळवाडी बेज देवळा आणि नितेश तायडे हे जळगाव येथील रहिवासी होते; मात्र हे तिघेही मयत शिक्षक पंचवटी भागात वास्तव्यास होते.