बागलाणच्या पश्चिम पट्ट्याला परतीच्या पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 05:48 PM2019-10-30T17:48:25+5:302019-10-30T17:49:25+5:30
वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या परतीच्या पावसाने दोन दिवसात सोंगणीस आलेल्या मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळिराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
परिसरात डाळिंब, उन्हाळी कांदा रोपे, लाल कांदा आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर मावा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव सुरु होता. त्यात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीने भर टाकली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या रबी हंगामाची सुरु वात खराब झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. उन्हाळी कांदा रोपे तर भुईसपाट झाली असून मक्याच्या कापणीची कामे सुरु असताना वादळी वाºयासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लावणी योग्य आलेले उन्हाळी उळे, शेतात पडलेल्या मक्याची कणसे, मक्याचा चारा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा मका भुईसपाट झालेला आहे. कापणी केलेल्या मक्याच्या कणसांच्या ढिगात पाणी शिरल्याने त्या मक्याला कणसे उगण्याची भीती व्यक्त होतआहे. परिसरातील बराच शेतकरी भाजीपाला उत्पादक असून परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसला. चार महिने राबराब राबून घेतलेल्या पिकांचे ऐन काढणी व कापणीच्या वेळेस झालेल्या नुकसानीने बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.