परतीच्या पावसाने कांदा, भात पिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 08:19 PM2019-09-26T20:19:54+5:302019-09-26T20:22:18+5:30
यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्या गतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बुधवारी दुपारनंतर संपूर्ण जिल्ह्याला धुवाधार धुणाऱ्या परतीच्या पावसाने कांदा व काढणीला आलेल्या भात पिकाला मोठा धोका निर्माण झाला असून, हंगामपूर्व द्राक्षांच्या मण्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचलेली पिके तर जवळपास नष्ट झाली असून, या पावसाचा दूरगामी परिणाम होऊन शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्या गतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला. अशातच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या शेतकºयांनी पूर्ण केल्या, परंतु पावसाने त्यानंतर पाठ फिरविली. जमिनीच्या ओेलाव्यात पिकांनी चांगलाच तग धरून बºयापैकी पिके वाढलेली असताना पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. अशातच भाद्रपदात उष्णतेचे प्रमाण वाढून कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे जमिनीची आर्द्रता नष्ट होऊन पिके कोरडी पडू लागली असताना शेतकºयांनी कशीबशी पिके वाचविली आहेत. आता पिके काढणीला आलेली असताना बुधवारी दुपारनंतर परतीच्या पावसाने जोरदार बरसून संपूर्ण जिल्ह्याला धुवून काढले आहे. अनेक गावांमध्ये शेतात गुडघ्याइतके पाणी साचले असून, काही ठिकाणी उभी बाजरी, मका, कांदा पावसाच्या तडाख्याने जमिनीवर झोपला आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात या पिकांना धोका निर्माण झाला आहे. बाजरी जमिनीवर झोपली असून, कणसे भिजली आहेत. तर चाळीत साठवलेल्या कांद्यालाही या पावसाचा फटका बसणार आहे. आर्द्रता वाढल्याने चाळीतील कांदा ओला होऊन त्याच्या सडण्याची प्रक्रिया जोरदार होण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली असून, लेट खरिपाच्या कांद्यासाठी लावलेली रोपेही पावसाच्या तडाख्याने उघड्यावर येऊन पडल्यामुळे संपूर्ण रोपे वाया जाण्याची शक्यता आहे. भाताला हलक्या पावसाची गरज असताना मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून जमिनीखाली असलेला भात बाहेर पडण्याची भीती आहे. विशेष करून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्यात भात व नागली पिके या पावसामुळे अडचणीत सापडली असून, काढणीवर आलेले सोयाबीन, उडीद व मूगाच्या शेंगा फुटण्याची शक्यता आहे. या पावसाचा रब्बी पिकांना लाभ होणार असला तरी, असाच पाऊस सुरू राहिल्यास खरिपाची पिके नष्ट होण्याची धास्ती शेतकºयांना आहे.