रेव्ह पार्टी झालेले बंगले लवकरच ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 01:32 AM2021-07-02T01:32:05+5:302021-07-02T01:32:42+5:30
गतपुरी रेव्ह पार्टीप्रकरणी एका बंगल्याचा मालक रणवीर सोनी हा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. इगतपुरीमध्ये त्याचा एक बंगला स्वमालकीचा, तर उर्वरित तीन बंगले त्याने भाडेतत्त्वावर व्यवसाय म्हणून चालविण्यास घेतले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून बंगल्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
नाशिक : इगतपुरी रेव्ह पार्टीप्रकरणी एका बंगल्याचा मालक रणवीर सोनी हा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. इगतपुरीमध्ये त्याचा एक बंगला स्वमालकीचा, तर उर्वरित तीन बंगले त्याने भाडेतत्त्वावर व्यवसाय म्हणून चालविण्यास घेतले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून बंगल्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. बॉलिवूडशी संबंधित विविध सेलिब्रिटींच्या सहभाग असलेल्या हवाइयन थीमवरील रेव्ह पार्टी प्रकरणात बंगला मालक सोनी यास पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्याच्या एका स्वमालकीच्या व दुसरे त्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या अशा दोन बंगल्यांमध्ये १२ महिला व १० पुरुष अशा २२ नशेबाजांची रेव्ह पार्टी रंगली होती. या पार्टीत ड्रग्ज, गांजा, कोकेन, चरस यासारख्या अमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी शनिवारी (दि.२६) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रेव्ह पार्टी उधळून लावली होती. या पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री संशयित हिना पांचालदेखील पोलिसांच्या हाती लागली असून, तीदेखील पोलीस कोठडीत आहे.
गुरुवारी इगतपुरी तालुका न्यायालयात ग्रामीण पोलिसांकडून या गुन्ह्याशी संबंधित विविध पुरावे, घटनास्थळी मिळून आलेल्या आक्षेपार्ह वस्तूंसह पंचनाम्यातील विविध गोष्टी सादर करण्यात आल्या. न्यायालयाच्या समक्ष या सर्व बाबींचा पुन्हा पंचनामा करून ते नव्याने सीलबंद करण्यात आले. दरम्यान, सोनी याच्या बंगल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून, येत्या दोन दिवसांत त्याच्याशी संबंधित संपत्ती सील होण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
--इन्फो--
नायजेरियन पीटर हा ड्रग्ज सप्लायर
मुंबईच्या साकीनाका येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या नायजेरियन नागरिक पीटर उमाही यास न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीतदेखील त्याच्याकडून फारसे सहकार्य पोलिसांच्या चौकशीला मिळत नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये पीटर याच्याविरुद्ध २०१९ साली मुंबईमधील एका पोलीस ठाण्यात ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याचे पारपत्र (पासपोर्ट) अद्यापही जप्त करण्यात आले आहे. व्यावसायिक म्हणून पीटर हा भारतात आल्याचे पासपोर्टवर नमूद करण्यात आले आहे. एकूणच अंमली पदार्थ ड्रग्ज पुरविणारा हा नायजेरियन पीटर मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत असून, यामागील रॅकेटपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.