गोदाकाठ सहाव्या दिवशी पूर्वपदावर
By admin | Published: August 7, 2016 10:12 PM2016-08-07T22:12:47+5:302016-08-07T22:13:25+5:30
पूर ओसरला : पाच गावांचे पंचनामे झाले पूर्ण
कसबे सुकेणे : गेल्या मंगळवारपासून गोदावरीच्या पुराचा सामना करणारी गोदाकाठची गावे सहाव्या दिवशी पूर्वपदावर आली असून चांदोरी, मौजे सुकेणेसह पाच गावांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागातर्फे कळविण्यात आली आहे.
गोदावरीच्या महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गोदाकाठवर मंगळवार नंतर शनिवारी पुराचे संकट कायम होते, त्यामुळे गोदाकाठच्या गावात अद्यापही पुराची भीती कायम आहे. आज रविवारी सायखेडा, चांदोरी, चाटोरी, शिंगवे येथील जनजीवन पूर्वपदावर आले. चाटोरी- सायखेडा, शिंगवे- सायखेडा, चांदोरी - सायखेडा (अवजड वाहतूक वगळून) हे सर्व रस्ते खुले झाल्याने बाजारपेठेतही आज गर्दी होती; मात्र बससेवा अद्यापही ठप्पच आहे. महसूल विभागाच्या चांदोरी मंडलच्या वतीने वीस तलाठी पथकाने गेल्या तीन दिवसांत पहिल्या टप्प्यातील पूरग्रस्त भागातील घरे व दुकाने यांचे पंचनामे पूर्ण केले असून रविवारी नागापूर येथील पंचनामे सुरु होते. सध्या शेतात पुराचे पाणी असल्याने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे लवकरच करण्यात येणार येतील. या पूरहानीत १३ जनावरे दगावली असून यात घोडा, गायी, म्हशी, शेळ्या, वासरे यांचा समावेश असल्याचे मंडल अधिकारी आर. के. बागुल यांनी सांगितले.रस्त्याची दुरवस्था पिंपळगाव बसवंत : येथे अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे या रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित प्रशासनाने रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.