उत्खनन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:42 AM2021-10-16T01:42:47+5:302021-10-16T01:43:43+5:30

सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील संतोषा, भागडी डोंगररांग बेलगाव ढगा व सारूळ गाव येथील उत्खननाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या स्थळ पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून उत्खनन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. डोंगरांचे उभे उत्खनन होत आहेच शिवाय उत्खननाचे सीमांकनच करण्यात आले नसल्याची बाबही समोर आली आहे.

Revealed that excavation rules are being violated | उत्खनन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघड

उत्खनन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघड

Next
ठळक मुद्देप्रत्यक्ष पाहणी दौरा : संतोषा, भागडी प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर

नाशिक : सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील संतोषा, भागडी डोंगररांग बेलगाव ढगा व सारूळ गाव येथील उत्खननाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या स्थळ पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून उत्खनन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. डोंगरांचे उभे उत्खनन होत आहेच शिवाय उत्खननाचे सीमांकनच करण्यात आले नसल्याची बाबही समोर आली आहे.

ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील संतोषा, भागडी येथील उत्खननाची पाहणी करण्यासाठी पश्चिम उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने गेल्या २८ सप्टेंबर रोजी ब्रह्मगिरी, संतोषा, भागडी येथील डोंगररांगेत होत असलेल्या उत्खननाची पाहणी केली तसेच समिती सदस्यांनी खानपट्टेधारक तसेच ग्रामस्थांशी देखील चर्चा करून स्थळ पाहणी केली असता त्यामध्ये अनेक बाबी नियमबाह्य निदर्शनास आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

पोलीस बंदोबस्तात झालेल्या या दौऱ्याला ब्रह्मगिरी येथून प्रारंभ झाला. गट न. १२३/१/ब या ठिकाणी समितीने भेट दिली असता यावेळी वन जमिनीत अतिक्रमण केले असल्याच्या तक्रारी समोर आल्या. गौणखनिज उत्खनन करावयाची जागा सीमांकित करणे तसेच त्याच्या चारही बाजूंनी कुंपण करणे बंधनकारक असतानाही काही खनिपट्टाधारक वगळता अन्य ठिकाणी जागा सीमांकित करण्यात आली नसल्याचे समितीला आढळून आले.

टेकड्यांचे शिखरे व उतार या गौणखनिजाचे उत्खनन करता येणार नाही, असे स्पष्टपणे अटी, शर्तींमध्ये नमूद असून देखील शिखरे व उतारे या ठिकाणी उत्खनन करण्यात आल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. टेकड्यांचा उतार कायम राहावा यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात याव्यात, पुरेशा प्रमाणात झाडांची लागवड करण्यात यावी, असे स्पष्ट आदेशात नमूद असूनही टेकड्यांचा उतार कायम राहण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेले नसल्याचे दिसून आल्याचे समितीला आढळले आहे.

ज्या ठिकाणी खनिपट्टा डोंगराळ भागात असेल तेथे डोंगररांगाचे उभे खणन करता येणार नसल्याचे आदेश असतानाही परवानाधारकांनी डोंगराळ भागातील डोंगररांगांचे उभे खणन करून गौणखनिज उत्खनन केल्याचे समितीला आढळल्याचा स्पष्ट उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. याशिवाय खाणपट्टाधारकांनी कुठेही हरित पट्टा तयार केलेला नाही. खाणपट्ट्यांमध्ये भूसुरुंग करताना त्यासंदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर विस्फोटाबाबत परवानगी कशी देण्यात आली, याविषयी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दस्तऐवज तपासून सांगितले जाईल, असे कळविले आहे, असा स्पष्ट अहवाल गर्ग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपुर्द केला असून त्यावर उपवन संरक्षक गर्ग यांच्यासह प्रांत तेजस चव्हाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Revealed that excavation rules are being violated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.