तक्रारकर्त्यांवर सूड : मर्जीतील विक्रेत्यांवर मेहेरनजर घासलेट वाटपात घोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:05 AM2018-04-07T01:05:05+5:302018-04-07T01:05:05+5:30
नाशिक : परवानाधारक घासलेट विक्रेत्यांच्या लाभार्थींकडील एक व दोन गॅस सिलिंडरची खातरजमा न करता विशिष्ट विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या मेहेरनजर करण्याच्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या कार्यपद्धतीची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झडू लागली आहे.
नाशिक : शहरातील परवानाधारक घासलेट विक्रेत्यांच्या लाभार्थींकडील एक व दोन गॅस सिलिंडरची खातरजमा न करता विशिष्ट विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या मेहेरनजर करण्याच्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या कार्यपद्धतीची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झडू लागली असून, पुरवठा खात्याच्या कारभाराविषयी तक्रारी करून थेट उपोषणाला बसलेल्या परवानाधारकांच्या घासलेट कोट्यात कपात करून मर्जीतील परवानाधारकांना मात्र मोकळीक देऊन घासलेटच्या वाटपात घोळ घालण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील परवानाधारकांना एकीकडे घासलेट नाकारण्यात आलेले असताना, दुसरीकडे नाशिक तहसील कार्यालयांतर्गत शहरातील परवानाधारकांना मात्र घासलेटचा पुरवठा केला जात असल्याने पुरवठा खात्यातील परस्परविरोधी भूमिकेचा थेट फटका नागरिकांना बसला आहे. शहरातील गॅस सिलिंडर ग्राहकांची यादी एजन्सीकडून घेऊन त्याची खातरजमा पुरवठा विभागाने त्या आधारे परवानाधारक घासलेट विक्रेत्यांचा कोटा ठरविता यावा म्हणून अॅप विकसित करण्यात आले आहे. परंतु या अॅपचा वापर ठरावीक परवानाधारक घासलेट विक्रेत्यांच्या विरोधातच करण्यात आला असल्याची तक्रार आता केली जात आहे. धान्य वितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी रेशन दुकानदारांकडे पैसे मागण्याचे प्रकार घडले होते. त्याचबरोबर अन्य तक्रारींची चौकशी करण्याच्या मागणीसाठी काही परवानाधारक घासलेट विक्रेते व रेशन दुकानदारांनी उपोषण आंदोलन केले होते. नेमका त्याचाच सूड घेण्यासाठी ज्यांनी उपोषण आंदोलन केले व ज्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला अशा घासलेट विक्रेत्यांना अॅपमध्ये आणून त्यांचा घासलेटचा कोटा कमी वा रद्द करण्यात आला. अन्य विक्रेत्यांना सूट देण्यात आल्याचा आरोप आता केला जात आहे. या प्रकारामुळेच ज्यांच्याकडे गॅस सिलिंडर आहेत त्यांच्या नावावरही घासलेट उचलले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी पुरवठा खात्याने शहरातील म्हणजेच धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाºया घासलेट परवानाधारकांकडून जबरदस्तीने सर्व शिधापत्रिकाधारक गॅसधारक असल्याचे लिहून घेतले होते, तर शहरातील काही भाग नाशिक तहसील कार्यालयाच्या कार्यकक्षेत असल्याने भागातील परवानाधारकांना घासलेट विक्रीसाठी दिले जात आहे. विक्रेत्यांना घासलेटचा कोटा देतानाही त्यात दुजाभाव केला जात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.