महसूलचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:30+5:302021-04-09T04:14:30+5:30

सिन्नर : कोरोना महामारीच्या काळात सिन्नर महसूल विभागाने २६ कोटींच्या महसूल वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण केले. प्रतिकूल काळात शासनाच्या तिजोरीत ...

Revenue collection objective met | महसूलचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण

महसूलचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण

Next

सिन्नर : कोरोना महामारीच्या काळात सिन्नर महसूल विभागाने २६ कोटींच्या महसूल वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण केले. प्रतिकूल काळात शासनाच्या तिजोरीत सिन्नरच्या महसूल विभागाने महत्त्वपूर्ण भर घातली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे राज्य शासनाच्या तिजोरीत पैशांचा ठणठणाट असतानाच तहसीलने गेल्यावर्षीपेक्षा तब्बल सहा कोटी रुपये अधिकचा महसूल शासनाकडे जमा केला आहे.

अवैध गौण खजिन उत्खनन करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाया, स्वामित्वधनाचा वाढवलेला भरणा, खरेदी-विक्री प्रकरणातील नजराणे व सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामामुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सिन्नर तहसीलने शासनाच्या तिजोरीत २६ कोटी ६२ लाख ८५ हजार १०३ रुपयांचा महसूल जमा केला आहे. उद्दिष्टापेक्षा दोन टक्के अधिकची वसुली करून सिन्नर तहसील कौतुकास पात्र ठरले आहे.

कोरोनामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच सहा महिन्यांहून अधिक काळ चाललेले लॉकडाऊन, त्यामुळे गौण खनिज उत्खननात झालेली घट, महसूल मिळवून देणाऱ्या व्यवसायांवर झालेला परिणाम बघता वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होईल किंवा नाही याबाबत सिन्नर तहसील साशंक होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात सहा महिने अतोनात मेहनत घेण्यात महसूल विभागाला यश आले. विशेष म्हणजे ऑक्टोबरपासून महसूल वसुली हाती घेण्यात आली. त्यानंतर जानेवारी ते मार्च अशा शेवटच्या तीन महिन्यात वसुलीवर लक्ष केंद्रित करीत महसूलचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत उद्दिष्ट पूर्ण केले.

-------------------------

गेल्या वर्षीपेक्षा सहा कोटी अधिक उद्दिष्ट असतानाही ते पूर्ण करण्यात महसूलला यश आले आहे. सिन्नर-शिर्डी चौपदरीकरणाचे काम, अवैध गौण खनिज उत्खनन, कृषक जमिनींचा अवैधरित्या होणारा वाणिज्य वापर, खरेदी-विक्री प्रकरणातील नजराणे आदी बाबी महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात हातभार लावणाऱ्या ठरल्या.

-राहुल कोताडे, तहसीलदार, सिन्नर

Web Title: Revenue collection objective met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.