महसूल विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:54+5:302021-01-01T04:09:54+5:30
जिल्ह्याला धान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा विभागाकडे जुने बांधकाम रचनेतील कमी क्षमतेची गुदामे होती. आता नवीन वर्षात १३ नवी गुदामे ...
जिल्ह्याला धान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा विभागाकडे जुने बांधकाम रचनेतील कमी क्षमतेची गुदामे होती. आता नवीन वर्षात १३ नवी गुदामे पुरवठा विभागासाठी उपलब्ध होणार आहेत. तीन हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमता असणारी ही गुदामे असून जवळपास प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ही गुदामे आता उपलब्ध होणार आहेत. जुन्या गुदामांची क्षमता कमी असल्याने धान्य साठवणुकीचा प्रश्न निर्माण होत होता. आता नव्या गुदामांमुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सर्वांसाठी रेशनकार्ड
रेशनवरील धान्य मिळण्यासाठी पात्र असलेला कुणीही या योजनेपासून वंचित राहाणार नाही यासाठी नवीन वर्षात शंभर टक्के संगणकीकरण केले जाणार आहे. लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग तसेच मोबाइल लिकिंग तपासले जाणार आहे. यातून योग्य लाभार्थी असेल त्यालाच रेशनकार्ड उपलब्ध होणार आहे. त्यामुळे धान्य वाटप मोहीम अधिक गतिमान होणार आहे. जे लोक रेशनकार्ड वापरत नाहीत त्यांचे कार्ड रद्द करून जे गरजू आहेत अशांनाच रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम राबविली जाणार आहे.
ग्रामपंचायती रोखणार अवैध उत्खनन
अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता ग्रामपंचायतींना सामावून घेतले जाणार आहे. याबाबतचे पत्र नवीन वर्षात ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. आपल्या तालुक्यात होणारे अवैध उत्खनन रोखण्यासाठी ग्रामपंतायतींनी माहिती देणे बंधनकारक करण्यात येणार असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ग्रामपंचायतींचा त्यात सहभाग आढळून आला तर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचीसुद्धा तरतूद असणार आहे. चाेरी रोखण्यासाठी लोकसहभाग वाढावा या हेतून ग्रामपंचायतींना सामावून घेतले जाणार आहे.
शेतात पोहचणार सौर ऊर्जा
राज्यातील शेतक-यांना दिवसा तसेच शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यातील २५ हजार आणि दुस-या व तिस-या टप्प्यातील उर्वरित ७५ हजार सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या शेतात सौर ऊर्जा पोहचणार आहे.