वसुलीसाठी महसूल खात्याची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:51 AM2018-03-30T00:51:29+5:302018-03-30T00:51:29+5:30
नाशिक : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असून, त्यातच चार दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे वसुलीची चिंता भेडसावू लागली आहे.
नाशिक : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असून, त्यातच चार दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे वसुलीची चिंता भेडसावू लागली आहे.
राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला यंदा २०५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उद्दिष्ट
अधिक असले तरी, करमणूक करापोटी दरवर्षी मिळणारे कोट्यवधी रुपये तसेच शिक्षण उपकर व रोहयो करापोटी मिळणारे कर आता बंद करण्यात आल्याने प्रशासनाला जवळपास ५० ते ६० कोटींचा फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत वसुलीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महसूल अधिकारी, कर्मचाºयांची धावपळ उडाली आहे. अशातच न्यायालयाने वाळू ठिय्यांच्या लिलावाला स्थगिती दिल्याने त्यापोटी मिळणारे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे नजराणा, गौणखनिज, शेतसारा, बिनशेती अशा करांच्या माध्यमातून वसुली केली जात असून, बुधवार अखेर १६४ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.
शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ७८ टक्के वसुली झाली असून, येत्या दोन दिवसांत ४० कोटी म्हणजे २२ टक्के वसुली करण्याचे आव्हान आहे. परंतु शासनाकडून दिलेले उद्दिष्ट अंतिम क्षणी कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच राज्य सरकारला पत्र पाठवून गौण खनिज, करमणूक कर आदी करांपासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याचे कळविले आहे. त्यामुळे शासनस्तरावर यासंदर्भात निर्णय होण्याची आशा महसूल खाते बाळगून आहे.