अधिकाऱ्यांच्या रजेने महसूलचे काम ठप्प
By admin | Published: December 11, 2015 12:02 AM2015-12-11T00:02:49+5:302015-12-11T00:06:21+5:30
अधिकाऱ्यांच्या रजेने महसूलचे काम ठप्प
नाशिक : नायब तहसीलदारांची ग्रेड पे वाढविण्यात यावी या मागणीसाठी नायब तहसीलदार ते अपर जिल्हाधिकारी संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन छेडल्याने गुरुवारी महसूल विभागाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. अधिकारीच कार्यालयात उपस्थित नसल्याने ‘अधिकारी रजेवर कर्मचारी वाऱ्यावर’ अशी परिस्थिती निर्माण झाली.
राज्यातील ३३ खात्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खात्याने सोपवून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतरत्र कामाची जबाबदारी नसताना त्यांना ४६०० रुपये ग्रेड पे असून, नायब तहसीलदारांना एकापेक्षा अनेक विभागाची कामे करूनही फक्त४३०० रुपये ग्रेड पे आहे. या संदर्भात गेल्या पंधरा वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा व आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले जात असताना, गेल्या वर्षी शासनाने ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही. त्यामुळे शासनाकडे नायब तहसीलदार, तहसीलदार व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सर्व अधिकाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा व विभागीय आयुक्तकार्यालयासमोर एक दिवस धरणे धरण्याचे आंदोलन छेडले. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी अकरा ते सायंकाळपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले, तत्पूर्वी अधिकारी रजेवर गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्तकार्यालयात दिवसभर कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. अधिकारीच नसल्याने दुपारनंतर शासकीय कर्मचाऱ्यांनीही कार्यालयातून काढता पाय घेतला, त्यामुळे शुकशुकाट होता. आंदोलनाची कल्पना नसल्याने जिल्हाभरातून आलेल्या अभ्यागतांचा अधिकारीच नसल्याने गैरसोया झाली.