दस्त नोंदणीतून एकाच दिवसात दीड कोटीचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:40+5:302020-12-06T04:15:40+5:30
नाशिक : बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या तीन टक्के कपातीला ...
नाशिक : बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या तीन टक्के कपातीला लाभ घेण्यासाठी नाशिकमधील व्यावसायिक आणि मालमत्ता खरेदीदार ग्राहकांकडून दस्त नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयांमध्ये रीघ लागत आहे. त्यामुळे उपनिबंधक कार्यालये शनिवारीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नाशिकमध्ये शनिवारी (दि.५) एकाच दिवशी झालेल्या ४२० दस्त नोंदणीच्या व्यावहारांमधून सरकारला सुमारे दीड कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे.
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात केल्यानंतर घर व प्लॉट खरेदीला चालना मिळाली असून, मुद्रांक शुल्कातील कपातीची सवलत ३१ डिसेंबरनंतर कमी होऊन २ टक्क्यावर येणार आहे. त्यामुळे संपूर्ण तीन टक्के शुल्क कपातीची सवलत घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी आणि शुक्रवारी सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे दस्त नोंदणीत आलेल्या अडचणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील सर्व दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये शनिवारीही (दि.५) नियमित कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाभरात दिवसभर ४२० दस्त नोंदणीचे व्यवहार झाले. या माध्यमातून मुद्रांक शुल्काचे १ कोटी १६ लाख ८० हजार ४२० तसेच नोंदणी शुल्काचे २६ लाख २६ हजार ७१० असे एकूण १ कोटी ४३ लाख ७ हजार १३० रुपयांचे शुल्क शासनाला मिळाले आहे.