मागील दाराच्या पदोन्नतीचा उधळला
By admin | Published: January 20, 2015 12:55 AM2015-01-20T00:55:07+5:302015-01-20T00:59:53+5:30
डाव सामान्य प्रशासन व लेखा विभागातील प्रकार
नाशिक : कार्यालयीन अधीक्षकांमधून अद्याप कक्ष अधिकाऱ्यांच्या पदोन्नती ‘प्रतीक्षेत’ असताना चक्क विभाग बदलून लेखा विभागातून सामान्य प्रशासन विभागात ‘अर्थ’पूर्ण गाठीभेटीनंतर पदोेन्नती देण्याचा डाव नुकताच उधळला गेल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांनी नकार दिल्यानंतरही त्यांना डावलून तालुका स्तरावरून हा प्रस्ताव परस्पर सामान्य प्रशासन विभागाने दाखल करून घेतल्याचे समजते. मात्र शेवटी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावावर नकारात्मक शेरा मारलेला असल्याने शेवटी हा विभाग बदलाचा डाव उधळला गेल्याचे समजते. बागलाण तालुक्यातील एका सहाय्यक लेखा अधिकाऱ्याला प्रकृती अस्वाथ्याच्या कारणास्तव पदोन्नती देऊन चक्क कक्ष अधिकारी देण्याबाबतचा हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाला. त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांनी सहायक लेखा अधिकारी यांना पदोन्नती दिल्यानंतर लेखाधिकारी पद दिले जाऊ शकते. मात्र सद्यस्थितीत मंजूर असलेल्या सहायक लेखाधिकारी व लेखाधिकारी यांची पदांची संख्या पाहता लगेचच पदोन्नती देणे अशक्य असल्याचे तसेच सहायक लेखा अधिकाऱ्याला विभाग बदलून चक्क कक्ष अधिकारीपदी पदोन्नती देता येणार नाही, असा शेरा या प्रस्तावावर मारल्याचे समजते. मात्र तरीही सहायक लेखा अधिकाऱ्याला कक्ष अधिकारीपदी पदोन्नती देण्याचा हा प्रस्ताव चक्क सामान्य प्रशासन विभाागाकडे दाखल करून घेण्यात आल्याचे कळते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावातील ‘गोम’ लक्षात घेऊन तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांचे नकारात्मक ‘मत’ विचारात घेऊन हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकरणामागे ठराविक मंडळी कार्यरत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात आहे. (प्रतिनिधी)