जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:51 AM2019-03-16T01:51:12+5:302019-03-16T01:51:23+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया कालमर्यादा कमी असल्याने कामाचे पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपली जबाबदारी नियोजनबद्ध पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या.
नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया कालमर्यादा कमी असल्याने कामाचे पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपली जबाबदारी नियोजनबद्ध पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मांढरे यांच्या उपस्थितीत निवडणूक कामकाज आढावा घेण्यात आला. मांढरे म्हणाले, आचारसंहिता काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी नियमानुसार कामकाज करावे. त्या अनुषंगाने बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि बसेसवरील तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले शासकीय जाहिरात फलके काढण्यात येऊन विकासकामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या कोनशिला व्यवस्थितरीत्या कापडाने झाकाव्यात, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांच्यासोबत सोशल मीडियावरील उमेदवारांच्या जाहिरातींचे दर निश्चित करावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅड पुरेशा
मशीनची व्यवस्था, निवडणूक कामकाजसंबंधित प्रशिक्षण व्यवस्था, निवडणूक खर्चाचे नियोजन, जिल्हा निवडणूक संवाद आराखडा, निवडणूक काळातील वाहतूक व्यवस्था, मतदान केंद्रावरील मतदानाची व्यवस्था, निवडणुकीसंबंधी संकेतस्थळ तसेच सॉफ्टवेअर व हार्डवेअर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देऊन नमूद विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंकज अशिया, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी तसेच जिल्ह्णातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.