संपूर्ण वाहन व्यवस्थेचा फेर आढावा घेऊन नवा प्रस्ताव
By Admin | Published: February 15, 2015 12:55 AM2015-02-15T00:55:52+5:302015-02-15T00:56:17+5:30
संपूर्ण वाहन व्यवस्थेचा फेर आढावा घेऊन नवा प्रस्ताव
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय वाहनांपेक्षा बाहेरच्या वाहनांचीच होणारी गर्दी व त्यातून निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेता जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी कार्यालयाच्या आवारातील संपूर्ण वाहन व्यवस्थेचा फेर आढावा घेऊन नवा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या जिल्हा न्यायालयात वाहनतळाचा प्रश्न गंभीर असून, वाहने उभी करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने न्यायालयातील वकील व पक्षकारांची वाहने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात उभी केली जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा यापूर्वीच उपलब्ध होऊन चारचाकी वाहनांसाठी शेडही करण्यात आले आहे, तर दुचाकी वाहनांनाही स्वतंत्र व्यवस्था आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच शासकीय कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या दृष्टीने वाहनतळाची व्यवस्था पुरेशी असली तरी, त्यात जिल्हा न्यायालयाच्या वाहनांची भर पडल्यामुळे आहे ती जागा अपुरी पडू लागली. परिणामी जागा मिळेल तेथे वाहने उभी राहू लागली असून, त्यातूनच वाहनांची गर्दी व बेशिस्ती वाढीस लागली आहे. बऱ्याचदा शासकीय कामांसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनांनाही या ठिकाणी जागा मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील मोकळ्या जागेवरील वाहतूक व्यवस्थेचा फेर आढावा घेण्यात यावा व नव्याने वाहनतळाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना मोकळीक देऊन अन्य खासगी वाहनांना मात्र तासिकेवर ‘पे अॅण्ड पार्किंग’ची सोय करून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)