जानेवारीपासून गॅस अनुदान बॅँकेत खात्यांचा आढावा : शुक्रवारी तेल कंपन्यांची बैठक
By admin | Published: December 10, 2014 01:34 AM2014-12-10T01:34:10+5:302014-12-10T01:34:48+5:30
जानेवारीपासून गॅस अनुदान बॅँकेत खात्यांचा आढावा : शुक्रवारी तेल कंपन्यांची बैठक
नाशिक : संपुआ सरकारच्या कारकिर्दीत गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या व नंतर नागरिकांच्या तक्रारींमुळे बंद करण्यात आलेले गॅस सिलिंडरवरील शासकीय अनुदानाची रक्कम येत्या १ जानेवारीपासून थेट ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी जिल्'ातील गॅस ग्राहकांची संख्या व त्यांचे बॅँक खाते याचा आढावा घेण्याचे काम सुरू झाले आहे. तेल कंपन्यांना या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्यामुळे येत्या शुक्रवारी याबाबत बैठक बोलविण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून देशातील ५४ जिल्'ांमध्ये गॅस ग्राहकांचे अनुदान थेट बॅँकेत जमा करण्यास सुरुवात झाली आहे, तर उर्वरित देशातील सर्व जिल्'ांमध्ये १ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. ज्या ग्राहकांचे बॅँकेत खाते नसेल त्यांचे अनुदान बॅँकेत जमा होणार नसल्याने ते शासनाच्या अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत त्यांना खाते उघडण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत ज्याचे बॅँकेत खाते त्यांनाच अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्र सरकारने राज्यातील नाशिकसह पाच जिल्'ांमध्ये या योजनेची सुरुवात केली होती. विशेष करून घासलेटचे अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग करण्यात आला; परंतु त्यानंतर गॅस ग्राहकांसाठी ही योजना अंमलात आली. गॅस ग्राहकांना बॅँक खाते व आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्याची सक्ती असल्याकारणाने बॅँकेत खाते उघडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडून, त्यातून अनेक वाद उपस्थित झाले. ज्या ग्राहकांचे अनुदान बॅँकेत जमा होऊ लागले त्यांना गॅस सिलिंडरमागे ४० ते ४५ रुपयांचा भुर्दंड बसू लागला, तर ज्यांनी खाते उघडले नाही, त्यांना अनुदानित सिलिंडर आहे त्याच भावाने मिळू लागल्याच्या तक्रारी झाल्याने शासनाने अखेर हा निर्णय मागे घेतला. आता पुन्हा एकवार केंद्रातील मोदी सरकारने हाच निर्णय लागू करण्याचा निर्णय घेऊन तसे आदेश तेल कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार येत्या १ जानेवारीपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असून, किती ग्राहकांचे बॅँकेत खाते आहेत, त्याची माहिती गोळा करणे सुरू झाले तर खुद्द तेल कंपन्यांकडूनही गॅस ग्राहकांना भ्रमणध्वनीवर लघु संदेश पाठवून अधिकाधिक ग्राहकांनी बॅँकेत खाते उघडावे यासाठी आवाहन केले जात आहे.