उच्चांकी कांदादराचा केंद्रीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:52 AM2019-09-22T01:52:29+5:302019-09-22T01:52:46+5:30
लासलगाव बाजार समितीत कांद्याने ५१०० रु पये भाव गाठल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व नाफेडचे अधिकारी यांच्याकडून कांद्याच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
लासलगाव : लासलगाव बाजार समितीत कांद्याने ५१०० रु पये भाव गाठल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व नाफेडचे अधिकारी यांच्याकडून कांद्याच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात बुधवारी (दि. १८) एका वाहनातील नऊ क्विंटल कांदा ५१०० रु पये प्रतिक्विंटल दराने विक्र ी झाला. कांदा भावातील चढ-उतारीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात एकच खळबळ उडाल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या अधिकारी पथकाने बाजार समितीला भेट देऊन एका रात्रीतून भावात एवढी तेजी कशी आली? यापुढील काळात बाजारभावातील चढ-उतार, सद्य:स्थितीत उपलब्ध असलेला शिल्लक कांदासाठा, नवीन कांदा पीक केव्हा व कधी येणार आणि ते येईपर्यंत साठा पुरेल का तसेच नाफेडमार्फत खरेदी झालेल्या कांद्यापैकी आतापर्यंत किती कांदा शहरी भागात पाठविण्यात आला व निर्यात शुल्क ८५० प्रतिटन झाल्यानंतर झालेल्या निर्यातीची माहिती घेतली.
सध्या कुठल्या राज्यातून कांद्याला अधिक मागणी आहे, याबाबतही माहिती घेण्यात आली. बैठकीस ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक अभयकुमार, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहायक संचालक पंकज कुमार, एमआयडीएचचे मुख्य सल्लागार आर. पी. गुप्ता, नाफेडचे निदेशक निखिल पठाडे, फलोत्पादन विभाग पुणेचे सहसंचालक शिरीष जमदाडे, विभागीय अधिकारी पणन मंडळाचे विभागीय अधिकारी बहादूर देशमुख, नाशिकचे उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. वाघ, तालुका कृषी अधिकारी बटू पाटील यांचा केंद्रीय पथकात समावेश होता. यावेळी बाजार समितीचे संचालक नंदकुमार डागा, शिवनाथ जाधव, सचिव नरेंद्र वाढवणे व व्यापारी नितीन जैन आदींनी पथकाचे स्वागत करून माहिती दिली.