जलजीवन अभियानाचा प्रधान सचिवांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:32 AM2021-11-26T01:32:01+5:302021-11-26T01:32:27+5:30
जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत प्रति दिन, प्रति माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष असल्याने २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी अभियान स्वरुपात काम करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी केले.
नाशिक : जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत प्रति दिन, प्रति माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष असल्याने २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी अभियान स्वरुपात काम करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी केले.
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील 'जल जीवन मिशन' व 'स्वच्छ भारत मिशन' व अटल भूजल या योजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जलजीवन अभियान हे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात विशेषत: महिलांच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे असून, जलजीवन मिशन अंतर्गत '९० दिवस मोहिम ' राबविण्यात येणार असून आहे. तसेच रेट्रोफिटिंग व नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देशही संजीव जयस्वाल यांनी दिले.
यावेळी जलजीवन मिशन तसेच स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागात नियोजनपुर्वक काम करुन विभागातील सर्व जिल्हयात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. बैठकीस उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी, तसेच पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व), कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता (मजिप्रा) वरिष्ठ भुवैज्ञानिक आदि बैठकीस उपस्थित होते.