मालेगावच्या वायू प्रदूषणाची वेळोवेळी समीक्षा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:36 AM2021-02-05T05:36:16+5:302021-02-05T05:36:16+5:30
एनजीटी चे प्रमुख न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत प्रत्यक्षात प्रदूषणाची स्थिती गंभीर असून लोकांचे स्वास्थ्य आणि ...
एनजीटी चे प्रमुख न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत प्रत्यक्षात प्रदूषणाची स्थिती गंभीर असून लोकांचे स्वास्थ्य आणि पर्यावरण हितासाठी कायद्याच्या कठोर पालनाची आणि लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मालेगाव मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांनी महिन्यातून एकदा समीक्षा करून त्याचा अहवाल महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठविण्यास सांगितले आहे. नाशिकसाठी पर्यावरणाची योजना तयार केली असून त्यात मालेगावशी संबंधित मुद्द्यांचा समावेश करावा, असेही नमूद करण्यात आले आहे. मोहमद युसूफ अब्दुल्ला शेख आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होत आहे. दरम्यान, मालेगाव शहरात प्लास्टिक जाळल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची नवी दिल्लीत सुनावणी झाली परंतु अद्याप महापालिकेला कोणतेही दिशा निर्देश प्राप्त झालेले नाहीत. दोन - तीन दिवसात आदेश महापालिकेला प्राप्त होतील अशी माहिती मनपाचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
इन्फो
लवकरच बैठक घेणार- कापडणीस
यासंदर्भात नेरी चार महिन्यांची मुदतवाढ मागणार आहे. त्यांना वेळ देऊन निर्देश दिले जातील. सध्या महापालिकेने प्लास्टिक कारखाने सील केले आहेत. त्यामुळे प्लास्टिक जाळून प्रदूषण होण्याचा प्रश्न येत नाही. या संदर्भात नगर विकास मंत्र्यांनी बैठक घेण्याचे आदेश दिले मात्र सध्या जिल्ह्यात राज्यपाल यांचा दौरा असल्याने कृषिमंत्री दादा भुसे त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे तूर्त बैठक होऊ शकली नाही. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे मनपा उपायुक्त कापडणीस यांनी सांगितले.