विधानसभा निवडणुकीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:20 AM2019-06-21T01:20:54+5:302019-06-21T01:22:17+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक कर्मचाऱ्यांना काहीशी उसंत मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी विभागातील निवडणूक तयारीबाबत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत कामकाजाच्या काही सूचना केल्या आहेत.
नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक कर्मचाऱ्यांना काहीशी उसंत मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी विभागातील निवडणूक तयारीबाबत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत कामकाजाच्या काही सूचना केल्या आहेत.
विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या पूर्व तयारीबाबत नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची आढावा बैठक विभागीय कार्यालयात घेतली.
लोकसभा निवडणुकीतील अनुभव, मतदार यादी शुद्धीकरण व नोंदणी, मनुष्यबळ व्यवस्थापन, दिव्यांग मतदार कल्याण यांसह मतदार जागृती तसेच संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आयुक्त माने यांनी सविस्तर आढावा घेतला. विधानसभा निवडणूक निर्दोष पाडण्यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिल. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लोकसभा निवडणुकीत राबविण्यात आलेल्या वॉर रूमसारख्या अनेक नवीन संकल्पनांची माहिती दिली.
बैठकीसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नंदुरबारचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तसेच उपायुक्त (सामान्य) रघुनाथ गावडे, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी आणि नाशिकचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरु ण आनंदकर यांच्यासह विभागातील उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.