स्मार्ट रोड जलवाहिनीच्या कामाची फेरतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:24 AM2019-09-28T01:24:48+5:302019-09-28T01:25:09+5:30
स्मार्ट रोडचे काम करताना महापालिकेच्या जलवाहिन्या सदोष पद्धतीने टाकण्यात आल्या असून, त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याची किंवा गळतीची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी या प्रकरणाबाबत स्मार्ट कंपनीला अवगत केले असून, आता या सर्व जलवाहिन्यांची चाचणी करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिले आहेत.
नाशिक : स्मार्ट रोडचे काम करताना महापालिकेच्या जलवाहिन्या सदोष पद्धतीने टाकण्यात आल्या असून, त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याची किंवा गळतीची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी या प्रकरणाबाबत स्मार्ट कंपनीला अवगत केले असून, आता या सर्व जलवाहिन्यांची चाचणी करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिले आहेत.
स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सुरू केलेल्या स्मार्ट रोडच्या कामाचे विवाद थांबतच नाहीत त्यात उलट वाढ होत आहे. दीड ते दोन वर्षांपासून रखडलेल्या या स्मार्ट रोडच्या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत, परंतु कामाच्या गुणवत्तेवरदेखील शंका घेतली जात आहे. जीपीओ जलकुंभाकडून या ठिकाणी जलवाहिनी त्र्यंबक नाका आणि तेथून मेहेर सिग्नलकडे जाते. परंतु जलवाहिनी टाकताना त्या सदोष पद्धतीने टाकण्यात आल्या. मुळातच त्याला एक मीटर खोली घेणे आवश्यक असताना तशी घेतली गेलेली नाही. तसेच क्रॉस कनेक्शन करताना पाण्यासंदर्भातील मॅन्युअलचे पालन झालेले नाही.
नियम निकष डावलून हे काम करीत असल्याचा आक्षेप महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याचवेळी घेतला होता. जलवाहिन्यांचा दाब तपासण्यासाठी चक्क अग्निशमन बंबातील पाणी सोडण्यात आले.
रायझिंग मेनवरुन जोडण्या
स्मार्ट रोडमधील कामांवर अनेक आक्षेप महापालिकेने यापूर्वीच घेतले आहेत. या रस्त्याच्या खालून जलवाहिन्या टाकताना चक्क रायझिंग मेनवरून नळजोडण्या देण्यात आल्या आहेत, असेदेखील सांगितले जाते. विशेषत: मेहेर परिसरात अशाप्रकारच्या नळजोडण्या दिल्याची चर्चा आहे.