क्रांतिदिनी अहिंसक मार्गानेच चक्का जाम; बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:44 AM2018-08-04T01:44:02+5:302018-08-04T01:44:27+5:30
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले ९ आॅगस्टचे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. क्रांतिदिनी राज्यभरात होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनात कोणती अनपेक्षित घटना घडून नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (दि.३) सिद्ध पिंपरी येथील सिद्धी गणेश मंदिराच्या आवारात मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिद्ध पिंपरी पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेऊन मराठा आंदोलनाविषयी भूमिका स्पष्ट केली.

सिद्ध पिंपरी येथील तालुकास्तरीय बैठकीत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, गणेश कदम, उमेश शिंदे, यांनी चक्का जाम आंदोलनाची आचारसंहिता समाजबांधवांना सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत शांततेच्याच मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. या आंदोलनाच्या काळात मराठा समाज पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करेल. त्याचप्रमाणे प्रशासनानेही सहकार्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, माजी जिल्हा परिषद भाऊसाहेब ढिकले, माजी सभापती अनिल ढिकले, उत्तम राजोळे, शंकर ढिकले आदी तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पाडण्याचे आवाहन करताना बैठकीतील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चातील महिला प्रतिनिधी अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, मनोरमा पाटील, मंगला शिंदे, रोहिणी दळवी आदींसह वैभव दळवी, सुरेश ढिकले, अंबादास ढिकले, पंडित जाधव, गणेश ढिकले, शशी ढिकले, भास्कर पवार,आदित्य पाटील, सतीश पवार, विनोद भ्रमणे, रामनाथ ढिकले उपस्थित होते. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देऊन हुतात्मा झालेल्या समाजबांधवांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पोेलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन
चक्का जाम आंदोलनास ९ आॅगस्टला सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून, हे आंदोलन सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात आंदोलनात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी समाजबांधवांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठा समाजाने आरक्षणासाठी ऐतिहासिक चक्का जाम करण्याचा निर्धार केला असून, आंदोलकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशा सूचनाही आंदोलकांना करण्यात आल्या.