कायमस्वरुपी अधिका-यांसाठी क्रांती दलाचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:24 PM2018-10-02T18:24:52+5:302018-10-02T18:25:52+5:30
सटाणा : रिक्त पदांवर नेमणुकांची मागणी
सटाणा : शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यास टाळाटाळ करणा-या बागलाणच्या प्रभारी गटविकास अधिका-यांसह विविध खात्यांचा प्रभारी पदभार काढून कायमस्वरूपी अधिका-यांची नेमणूक करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरकर, तालुकाध्यक्ष लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.२)पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
जितेंद्र देवरे गेल्या आठ महिन्यांपासून रजेवर गेल्यामुळे देवळ्याचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे बागलाणच्या गटविकास अधिका-यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. मात्र पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिल्यापासून अनेक योजना रखडल्या असल्याचे महाराणा प्रताप क्रांती दलाच्या पदाधिका-यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी ,पशुधन विकास अधिकारी ,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आदी प्रमुख पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातून समस्या घेऊन येणा-या ग्रामस्थांना तसेच सरपंच ,अन्य पदाधिका-यांना अक्षरश: हेलपाटे मारावे लागतात. पाटील यांच्याविषयी वाढत्या तक्ररींमुळे अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरकर, तालुकाध्यक्ष लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा सहसंघटक नथू ठोके ,उपाध्यक्ष जयेश जाधव, संजय पवार, समाधान अहिरे ,युवराज निकम,दीपक ठोके आदी सहभागी झाले आहेत.
अनेक योजना रखडल्या
रिक्त जागांवर असलेल्या प्रभारी अधिका-यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे तालुक्यातील अनेक योजना रखडल्या असल्याचा आरोप पदाधिका-यांनी केला आहे. सध्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यात अनेक गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे. बहुतांश गावांच्या पाणी योजना कोलमडल्या आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना देखील रखडली असल्याचे म्हटले आहे.