अवकाळी पावसामुळे भात उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 06:52 PM2020-12-16T18:52:14+5:302020-12-17T00:46:26+5:30

नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी आलेले पीक जमिनदोस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असून आणि त्यातच करपा, तुडतुड्या या रोगाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Rice growers worried over unseasonal rains | अवकाळी पावसामुळे भात उत्पादक चिंतित

अवकाळी पावसामुळे भात उत्पादक चिंतित

Next
ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : करपा, तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव

इगतपुरी तालुक्यात जवळपास तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. यावर्षी सुरुवातीला पावसाने सुरुवात चांगली केली असली तरी शेतकऱ्यांनी पीक विमे भरले असताना शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. भातालाही कवडीमोल भाव असल्यामुळे दिवाळीतदेखील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. भात पिकाचे करपा व तुडतुड्या या रोगाने नुकसान केले आहे. इगतपुरी तालुका कृषी विभागाच्यावतीने रोग गेलेल्या भात पिकावर पंचनामे करण्याचे सौजन्यदेखील दाखवले नाही. अशा अक्षम्य कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी यांची तालुक्यातून बदली करण्याची मागणी शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ यांनी केली आहे.
गत काही वर्षात वाढलेली महागाई शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात भक्कम वाढ करणारी ठरलेली असताना भातास मिळणारा बाजारभाव शेतकऱ्यास कर्जबाजारी करत आहे. खडीबरड एकर दीड एकर जमीन असलेला अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी भातशेती करण्यापेक्षा ती शेतजमीन विकून पोट भरण्याच्या मार्गाला लागलेला दिसून येत आहे. आजच्या दिवसात भातशेतीस लागवडीसह एकरी खर्च २० हजाराच्या पुढे गेला आहे तर मिळणारे उत्पन्न दहा ते पंधरा हजाराची मर्यादा ओलांडत नाही. सरासरी एकरी उत्पन्न १० क्विंटल आहे. किमान भाव २००० रुपये मिळाल्यास एकूण उत्पन्न २०००० रुपये व खर्च २५००० असा तोट्याचा धंदा झाला आहे.
भात पिकास येणारा खर्च याप्रमाणे आहे
बियाणे - २००० रुपये
मशागत - ३००० रुपये
खते - ५०० ते २००० रुपये
लावणीची मजुरी - १०००० रुपये
निंदण मजुरी - ३००० रुपये
सोंगणी व इतर - ५००० रुपये
एकूण २५००० रुपये आणि एकरी उत्पन्न २० हजार.
यावर्षी सर्वदूर अवकाळी पावसाने व रोगाने भात शेती अगदी भुईसपाट केली आहे. पावसाचा हंगाम होऊन गेल्यानंतरही ही पिके शेतात पडून होती. एकीकडे पाऊस सुरू आणि खाली बळीराजा भात झोडण्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. इगतपुरी कृषी विभागाकडून पंचनामे कधी झाले, तेच समजलं नाही. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या व रोगाच्या कचाट्यातून वाचलेली भात पिके वाचवली असताना इगतपुरी कृषी विभागाने पंचनामे केले नाही.
- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी संघटना

Web Title: Rice growers worried over unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.