रिक्षाचालकाने पैशांचे पाकीट केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:42 AM2019-06-18T00:42:44+5:302019-06-18T00:43:21+5:30
गेल्या ७ तारखेला द्वारका चौकातून के. के. वाघ महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या विद्यार्थ्याचे पाकीट रिक्षातच राहिल्याने सदर पाकीट पोलिसांच्या समक्ष त्यास परत केल्याने रिक्षाचालक जावेद सय्यद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक : गेल्या ७ तारखेला द्वारका चौकातून के. के. वाघ महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या विद्यार्थ्याचे पाकीट रिक्षातच राहिल्याने सदर पाकीट पोलिसांच्या समक्ष त्यास परत केल्याने रिक्षाचालक जावेद सय्यद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
द्वारका चौकात उभे असताना सकाळच्या सुमारात त्यांच्या रिक्षात के. के. वाघ महाविद्यालयातील विद्यार्थी बसला. त्याला सोडून रिक्षाचालक सय्यद परत आले असता त्यांना रिक्षात जावेदचे पाकीट आढळले. त्यामध्ये पाच हजार रुपये रोख, कॉलेजचे ओळखपत्र, एटीएम कार्ड, आधार कार्ड व पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. सय्यद यांनी सदर बाब श्रमिक सेनेचे स्टॅन्ड अध्यक्ष अलीम शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भगवंत पाठक, अलिम शेख, अश्पाक सय्यद यांनी त्वरित भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून पाकीट त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तत्काळ संबंधित विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्याला पोलीस ठाण्यात बोलाविले. ओळख पटविण्यात आल्यानंतर पाकीट विद्यार्थ्याच्या ताब्यात देण्यात आले.
सय्यद यांच्या प्राामणिक-पणाबद्दल संबंधित विद्यार्थी आणि पोलिसांनीदेखील सय्यद यांचे आभार मानले. सय्यद सारखे प्रामाणिक रिक्षा चालक आपल्या हद्दीत असल्याचा अभिमान वाटतो असे पोलिस निरिक्षक सूर्यवंशी यांनी आभार मानले़