रेल्वे प्रबंधकांना रिक्षाचालकांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:42 AM2018-03-29T00:42:47+5:302018-03-29T00:42:47+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकाची तपासणी करण्यास आलेले भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांना रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन टाकू नये म्हणून रिक्षाचालकांनी घेराव घालून विरोध केला. दरम्यान, यादव यांनी नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाची पाहणी करून तपासणी करत माहिती घेतली.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाची तपासणी करण्यास आलेले भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांना रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन टाकू नये म्हणून रिक्षाचालकांनी घेराव घालून विरोध केला. दरम्यान, यादव यांनी नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाची पाहणी करून तपासणी करत माहिती घेतली. रेल्वेच्या भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनीलकुमार मिश्रा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाची पाहणी करून तपासणी केली. यादव नाशिकरोड रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यास येणार असून, रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन टाकण्यास रिक्षाचालकांचा तीव्र विरोध असल्याने सकाळपासून रिक्षाचालकांनी रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. यामुळे रेल्वेने आलेल्या प्रवाशांना रिक्षाचालकांच्या बंदमुळे सामान घेऊन बाहेरील रिक्षा स्टॅन्डपर्यंत पायपीट करावी लागली. गेल्या ३०-४० वर्षांपासून या ठिकाणी प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय करत आहे. रिक्षा स्टॅण्ड रॅकमध्ये सलग पाच रिक्षा एका रांगेत लागू शकतात. सध्या रॅकमध्ये काही अंतर सोडून लावलेल्या लोखंडी लेनमुळे अगोदरच मोठी अडचण होत आहे. काही अंतर सोडून असलेले लोखंडी लेन सरसकट केल्यास पाच लाईनमध्ये रिक्षा बसणार नाही. त्यामुळे रिक्षा रेल्वेस्थानकाच्या आवारात उभ्या केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होईल. ओलासारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसाठी रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन लावून जागा उपलब्ध करून देण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असे रिक्षाचालकांनी यादव यांना सांगितले. त्यानंतर यादव यांनी स्थानकाची पाहणी करून सरकता जिना व इतर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी नाशिकरोड रेल्वेस्थानक अधीक्षक आर. के. कुठार व रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.