रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ रिक्षाचालकांचा पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:02 AM2018-05-30T00:02:39+5:302018-05-30T00:02:39+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात रिक्षा रॅकमध्ये काही अंतराने लावलेले लोखंडी बॅरिगेट्स एकमेकांना जोडावेच लागतील असे रेल्वे भुसावळ विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तीन दिवसांपासून रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी बंद पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत रिक्षा युनियनचे पदाधिकारी दिल्लीला रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात रिक्षा रॅकमध्ये काही अंतराने लावलेले लोखंडी बॅरिगेट्स एकमेकांना जोडावेच लागतील असे रेल्वे भुसावळ विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तीन दिवसांपासून रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी बंद पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत रिक्षा युनियनचे पदाधिकारी दिल्लीला रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या भेटीसाठी गेले आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात रिक्षा रॅक असून, त्यामध्ये चार रांगेने रिक्षा उभ्या राहतात. काही महिन्यांपूर्वी रिक्षा रॅकच्या मधोमध काही अंतर सोडून लोखंडी बॅरिगेट्स लावण्यात आले. त्या बॅरिगेट्समुळे मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार रिक्षाचालक करत होते. काही अंतराने लावलेले लोखंडी बॅरिगेट््स एकमेकांना जोडण्याचे काम रेल्वे प्रशासनाने २५ दिवसांपूर्वी हाती घेतले होते. रिक्षा रॅकमध्ये लोखंडी बॅरिगेट््स एकमेकांना जोडून एक लेन खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबेर यांच्यासाठी देण्याचा घाट रेल्वे प्रशासन घालत असल्याचा आरोप रिक्षा चालक-मालक युनियनच्या वतीने करत रिक्षा बंद आंदोलन केले होते. खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीने भुसावळ विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांच्यासोबत रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे व रिक्षा युनियनच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. बैठकीमध्ये रिक्षाचालकांचा यावरच उदरनिर्वाह चालत असून, गेल्या ३०-४० वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना सिन्नरफाटा बाजूने प्लॅटफॉर्म चार येथे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मान्य करण्यात आली होती.
मात्र चार दिवसांपूर्वी नाशिकरोड रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यास आलेले भुसावळचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी रिक्षा रॅकमधील बॅरिगेट््स एकमेकांना जोडावेच लागेल, असे स्पष्ट करून तसे संबंधित अधिकाºयांना निर्देशदेखील दिले. खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना सिन्नरफाटा बाजूने जागा देण्यात यावी, रेल्वेस्थानकाच्या आवारातील रिक्षा रॅकमध्ये ओला, उबेर वाहनांना जागा देऊ नये या मागणीसाठी पुन्हा रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. ऐन सुटीच्या हंगामात प्रवाशांची मोठी वर्दळ असताना रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदमुळे प्रवाशांची गेल्या तीन दिवसांपासून मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी अद्यापपर्यंत टेंडर काढलेले नाही. मात्र जागेची पूर्ण तजवीज झाल्यानंतर टेंडर काढण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांकडून रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला जात आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला पदाधिकारी
नाशिकरोड रेल्वेस्थानकांच्या आवारात ३०-४० वर्षांपासून रिक्षाचालक व्यवसाय करीत आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना रिक्षा रॅकमध्ये जागा देऊ नये याकरिता खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत रिक्षा चालक-मालक युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे, रमेश दाभाडे व इतर पदाधिकारी दिल्लीला रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्या बैठकीत होणाºया चर्चा व निर्णयावर पुढील सर्वकाही अवलंबून आहे. रेल्वेच्या जागेमध्ये रिक्षा-टॅक्सी चालक विनामोबदला व्यवसाय करतात, तर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला मोबदला देण्यास तयार आहे. त्यामुळे आज ना उद्या खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनांना जागा उपलब्ध करूनच दिली जाईल, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी खासगीत बोलताना सांगितले.