रिक्षा-टॅक्सीचालक, परवान्याचा तपशील देणे ठरणार बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:10 AM2019-03-31T01:10:40+5:302019-03-31T01:11:06+5:30
आॅटो रिक्षा तसेच टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या माहितीसाठी तसेच गैरप्रकारांवर आळा बसावा, यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी केलेल्या ठरावानुसार नाशिक जिल्ह्यातील आॅटो रिक्षा तसेच टॅक्सी परवानाधारकाचा परवाना आणि वाहन चालकाचा तपशील प्रवाशांना माहितीसाठी व सहज दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे.
पंचवटी : आॅटो रिक्षा तसेच टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या माहितीसाठी तसेच गैरप्रकारांवर आळा बसावा, यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी केलेल्या ठरावानुसार नाशिक जिल्ह्यातील आॅटो रिक्षा तसेच टॅक्सी परवानाधारकाचा परवाना आणि वाहन चालकाचा तपशील प्रवाशांना माहितीसाठी व सहज दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे.
यासाठी श्रद्धा आर्ट यांची नेमणूक करण्यात आली असून, स्टिकर देणार आहे. त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ज्या परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांनी अद्यापपर्यंत स्टिकर्स घेतले नाही त्यांनी येत्या ३० मे पर्यंत स्टिकर्स घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जे परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालक स्टिकर्स घेणार नाहीत त्यांच्यावर येत्या १ जूनपासून कलम ८६ /१७७ नुसार कारवाई केली जाणार आहे.
नोंदणी झालेल्या दिनांकापासून २० वर्ष पूर्ण झालेल्या आॅटो रिक्षा व टॅक्सीचालक परवानाधारकांनी त्यांच्या वाहनाची नोंदणी तत्काळ रद्द करून घ्यावी. ज्या वाहनधारकांनी वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतरही वाहन स्क्र ॅप केलेले नाही, त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस यांच्यामार्फत १ एप्रिलपासून संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आलेल्या ठरावानुसार जिल्ह्यातील आॅटो रिक्षा व टॅक्सी यांचे वयोमान नोंदणी केलेल्या तारखेपासून २० वर्ष इतके मर्यादित करण्यात आले आहे.