अस्वच्छतेविरोधात कठोर नियमावली
By admin | Published: December 23, 2014 12:43 AM2014-12-23T00:43:16+5:302014-12-23T00:51:12+5:30
पालिकेकडून कार्यवाही सुरू : आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यास येत्या महासभेत येणार प्रस्ताव
नाशिक : शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कठोर नियमावली तयार करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्यविभागाकडून सुरू असून, आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर येत्या महासभेत त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ‘अमुल्या क्लिन अप’ची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने आता ठेका देण्याऐवजी स्वत:च नव्याने कठोर नियमावली तयार करून त्याच्या अंमलबजावणीचे संकेत दिले आहेत.
शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेने मुंबई, सुरतच्या धर्तीवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेऊन त्यासाठी ‘अमुल्या क्लिन अप’ या खासगी संस्थेला ठेका देण्यात आला होता. सदर ठेकेदाराला विनानिविदा काम देण्यात आल्याने नगरसेवकांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला होता. परंतु सदस्यांच्या विरोधानंतरही जानेवारी २०१३ मध्ये अमुल्या क्लिन अप या संस्थेला महापालिका कार्यक्षेत्रात दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले होते. परंतु या संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून ठराविक भागातच दंडाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या.
दंडात्मक कारवाईच्या नावाखाली पैसे उकळण्याचेही प्रकार घडत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. प्रामुख्याने ठक्कर बाजार बसस्थानकावर बाहेरगावच्या प्रवाशांची कारवाईच्या नावाखाली लूट होत होती. त्यासंबंधीच्या तक्रारी तत्कालीन आयुक्तांकडे गेल्यानंतर आयुक्तांनी गर्दीच्या ठराविक भागातच कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. अमुल्या क्लिन अप या संस्थेमार्फत कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात होते; परंतु प्रत्यक्षात सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेत काहीच फरक पडलेला दिसून येत नव्हता.
आता संबंधित ठेकेदाराच्या दंडात्मक कारवाईतून नाशिककरांची सुटका झाली असली तरी अस्वच्छता करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी महापालिकेनेच त्यासंबंधी नव्याने नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यासंबंधी आरोग्य विभागाला सूचनाही केल्या आहेत. नव्या नियमावलीत दंडाची रक्कम वाढविली जाणार असून, नियमावलीतही कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)