रिक्षाचालकांची प्रतिमा बदलण्यासाठी ‘रिक्षासारथी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:35 AM2018-08-01T00:35:01+5:302018-08-01T00:35:25+5:30
नाशिक : प्रवाशांसोबत अरेरावी, बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे अशी रिक्षाचालकांची शहरवासीयांमध्ये प्रतिमा तयार झाली आहे़ मात्र, या व्यवसायामध्येही चांगल्या प्रवृत्तीचे रिक्षाचालक असून, रिक्षात राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग, रोख रक्कम, शालेय प्रमाणपत्रे प्रामाणिकपणे परत करणारे रिक्षाचालकही शहरात बहुसंख्येने आहेत़ रिक्षाचालकांची प्रतिमा सुधारावी यासाठी शहर पोलीस व संक्रमण सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘रिक्षासारथी - आदर्श रिक्षाचालक नाशिकची ओळख’ ही नवीन संकल्पना सुरू केली असून त्याचा शुभारंभ मंगळवारी (दि़३१) करण्यात आला़ शहर पोलीस मुख्यालयातील बॅरेक क्र. १७ मध्ये झालेल्या या कार्यक्रमात रविवार कारंजा परिसरातील ४० रिक्षाचालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ प्रवाशांसोबत चांगली वर्तणूक ठेवणारे, कागदपत्रे सोबत ठेवणाऱ्या रिक्षाचालकांची खात्री करून शहरातील चौदा रिक्षाचालकांना आदर्श रिक्षाचालक म्हणून गौरविण्यात आले़ यावेळी संक्रमण जनशक्ती मंच व पोलीस आयुक्तालयातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात दहा रिक्षाचालकांना ‘रिक्षासारथी’च्या फलकाचे वाटप करण्यात आले. तर डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी ‘मी आहे आदर्श रिक्षाचालक’ याची शपथ प्रतिज्ञापत्र वाचून रिक्षाचालकांना दिली. यावेळी उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त डॉ. अजय देवरे, भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, फुलदास भोये, संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड, संक्रमण जनशक्ती मंचचे मंदार ओलतीकर, माईंड ट्रिक्स एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे राहुल रायकर, डॉ. स्वप्निल देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांनी केले.
प्रामाणिक रिक्षाचालकांचा सन्मान
रिक्षासारथी ही संकल्पना राबविल्याने प्रवाशांमध्ये रिक्षाचालकांविषयीचा विश्वास निर्माण होऊन त्यांच्यात एकप्रकारे ऋणानुबंध निर्माण होतील अशी अपेक्षा सहायक आयुक्त डॉ. देवरे यांनी व्यक्त केली. रिक्षाचालक नाना हिरे, विजय पवार, किशोर खरताळे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलताना, रिक्षाचालकांविषयी समाजात गैरसमज आहेत. त्यास कारणीभूत आमच्यातीलच काही अप्रामाणिक रिक्षाचालक असून ज्यामुळे रिक्षाचालक बदनाम झाला आहे. परंतु प्रवाशांना सेवा देताना कायद्याचेही पालन झाले पाहिजे अशा प्रामाणिक रिक्षाचालकांचा सन्मान होणे ही बाब अभिमानाची असल्याचे म्हणाले.