कोरोना आटोक्यात आणण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:49+5:302021-05-29T04:11:49+5:30
नांदूरशिंगोटे : परिसरातील गावांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून २५ जणांचा समावेश असलेले दंगल नियंत्रण पथक तैनात ...
नांदूरशिंगोटे : परिसरातील गावांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून २५ जणांचा समावेश असलेले दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर चांगल्या प्रमाणात आळा बसला असल्याचे चित्र आहे. वावी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील गावांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशानुसार २५ जणांचा समावेश असलेल्या दंगल नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूरशिंगोटे व परिसरातील गावांमध्ये या पथकाचे संचलन करण्यात आले. जिल्ह्यातील निर्बंध २४ मेपासून शिथिल झाल्याने राज्यातील ‘ब्रेक द चेन’ची नियमावली लागू असल्याने त्या पार्श्वभूमीवर या तुकडीची नियुक्ती करण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पोलीस (आरसीपी) हे विशेषतः प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे. हे विशेष बल व्यावसायिक मार्गाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास सक्षम असून, दंगलसदृश परिस्थिती कुशलतेने त्याचा सामना करण्यास सक्षम आहे.
-----------------
नियमांचे पालन करा गर्दी करून बसणारे, मास्क न वापरणारे, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर तुकडी कायदेशीर कारवाई करणार आहे. ज्या गावात जास्त रुग्ण आहेत, तेथे तुकडी पाहरा देत आहे. किराणा दुकाने, अत्यावश्यक सेवेतील आस्थापना, कृषी केंद्रे, दूध विक्री करणाऱ्यांना सोमवारपासून सकाळी ७ ते १२ यावेळेत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी दिली.