वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंगल नियंत्रण पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:09+5:302021-05-25T04:16:09+5:30
सिन्नर : वावी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणा-या ४४ गावांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशानुसार ...
सिन्नर : वावी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणा-या ४४ गावांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशानुसार २५ जणांचा समावेश असलेल्या दंगल नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वावी परिसरातील गावांमध्ये या पथकाचे संचलन करण्यात आले.
जिल्ह्यातील निर्बंध २४ मे पासून शिथिल होत असतानाच राज्यातील 'ब्रेक द चेन'ची नियमावली लागू असल्याने त्या पार्श्वभूमीवर या तुकडीची नियुक्ती करण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पोलीस (आरसीपी) हे विशेषतः प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक आहे. हे विशेष बल व्यावसायिक मार्गाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे आणि दंगलसदृश परिस्थिती कुशलतेने त्याचा सामना करण्यास सक्षम आहे. कोणत्याही विद्रोहास किंवा बंडाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आरसीपीच्या प्रत्येक कंपनीकडून एका प्लॅटूनला प्रतिबंधात्मक रणनीतीचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना जलद प्रतिक्रिया पथक म्हणून विकसित केले गेले आहे. गर्दी करून बसणारे, मास्क न वापरणारे, अनावश्यक कामासाठी बाहेर फिरणारे अशा व्यक्तींवर तुकडी कायदेशीर कारवाई करणार असून ज्या गावात जास्त रुग्ण आहेत, तेथे तुकडी कडक पहारा देणार आहे. किराणा दुकाने, अत्यावश्यक सेवेतील आस्थापना, कृषी केंद्रे, दूधविक्री आदी यांना सोमवार (दि.२४) पासून सकाळी ७ ते ११ यावेळेत नियमांचे पालन करून दुकाने उघडण्यास मुभा असून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ज्या आस्थापना नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी दिली.
कोट...
सोमवार, दि.२४ मेपासून लॉकडाऊन काहीसा शिथिल झाला असला तरी ब्रेक द चेन याअंतर्गत नियमावली ३१ मे पर्यंत लागू आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व भाजीपाला विक्री सुरू राहणार असली, तरी प्रत्येक व्यावसायिकाने त्याची स्वतःची व कामगारांची कोरोना रॅपिड टेस्ट करून निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र स्वतःजवळ बाळगावे. अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सागर कोते, सहायक पोलीस निरीक्षक, वावी
फोटो - २४ सिन्नर ३
वावी गावात दंगल नियंत्रण पथकाबरोबर संचलन करताना सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, हवालदार नितीन जगताप.