यात्रोत्सवात रंगली कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:21 PM2019-12-29T22:21:45+5:302019-12-29T22:22:22+5:30
देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगल राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगिरांमुळे कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
सटाणा : येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगल राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगिरांमुळे कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
यंदा राज्य व परराज्यातील महिला व युवती मल्लांनी स्वयंस्फूर्तीने कुस्ती दंगलीत सहभाग घेतल्याने ही दंगल चांगलीच रंगली. हे या दंगलीचे प्रमुख आकर्षण ठरले. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्यातर्फेलावण्यात आलेल्या छोटू खांडेकर (साक्र ी) व सोनू दळवी (चाळीसगाव) यांच्यातील चांदीचे कडे आणि पाच हजार रुपयांच्या अत्यंत चुरशीचा व उत्कंठावर्धक झालेला अंतिम सामना सायंकाळी सात वाजेपर्यंत रंगला. अखेर सामना बरोबरीत सुटल्याने खांडेकर व दळवी या कुस्तीपटूंना पारितोषिक विभागून देण्यात आले. येथील देवमामलेदार मंदिराच्या मागील बाजूकडील आरम नदीपात्रात देवमामलेदारांच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवारी कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन वाजता आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ वाढवून कुस्ती दंगलीला प्रारंभ झाला.
रोख स्वरूपात पारितोषिके
कुस्ती दंगलीसाठी राज्य व परराज्यातील शंभरहून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. लहान वयोगटातील कुस्तीगिरांच्या कुस्तीपासून सुरु वात झाली. देवस्थानतर्फेनारळ व रोख रक्कम या विजयी कुस्तीपटूंना देण्यात आली. शंभर रु पयांपासून ते अकरा हजार रु पयांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. मानाच्या कुस्त्यांसाठी दोन हजार ते पाच हजार रु पयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. सटाणा पोलीस ठाणे व काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही रोखीच्या बक्षिसांच्या कुस्त्या लावल्या.
अवघ्या पाच वर्षांच्या हिरकणी खैरनार आणि सायली खैरनार या चिमुकलींचा रंगलेला कुस्तीचा सामना आजचे प्रमुख आकर्षण ठरला. यामध्ये हिरकणी खैरनार हिने विजय मिळविला. प्रज्ञा बिरवच्छे (इगतपुरी) हिने शुभेच्छा जाधव (लासलगाव), सर्वज्ञा पवार (मालेगाव) हिने अरु णा डंबाळे (पुणेगाव), प्रियांका मंडाले (चांदवड) हिने पूजा पवार (कंधाने) तर पल्लवी हेंबाडे (पिंपळगाव) हिने साक्षी आहेर (देवळा) हिला चारीमुंड्या चीत करीत विजय मिळविला.
कुस्ती दंगलीमध्ये राज्यातील नाशिक, औरंगाबाद, येवला, मालेगाव, मनमाड, धुळे, नंदुरबार, चोपडा, पारोळा, नगर, जळगाव, नवापूर, पिंपळनेर आदींसह परराज्यातून कुस्तीपटू दाखल झाले होते. कुस्ती दंगली पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कुस्तीशौकिनांनी गर्दी केली होती. देवस्थानने आता दंगलीत युवतींचा सहभाग वाढविला आहे. या युवतींच्या कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती.