म्हसोबा यात्रेत रंगली कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:15 AM2018-02-24T01:15:49+5:302018-02-24T01:15:49+5:30
देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. तर सायंकाळी यात्रेत भाविक व महिलांची दर्शन व खरेदीसाठी गर्दी झाली होती.
नाशिकरोड : देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. तर सायंकाळी यात्रेत भाविक व महिलांची दर्शन व खरेदीसाठी गर्दी झाली होती. श्री म्हसोबा महाराज यात्रेला गुरूवारी सकाळी उत्साहात प्रारंभ होऊन दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात्रेच्या दुसºया दिवशी शुक्रवारी यात्रेला दर्शनासाठी व खरेदीसाठी नागरिक, महिलांची गर्दी झाली होती. दुपारनंतर यात्रेत मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. देवळालीगाव सोमवार पेठ येथील कुस्ती मैदानात सायंकाळी आमदार योगेश घोलप, पंच कमिटीचे अध्यक्ष अॅड. शांताराम बापू कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन कुस्ती दंगलीस प्रारंभ झाला. प्रारंभी लहान मुलांच्या व कुस्तीपटूंच्या कुस्त्या झाल्या. मात्र त्यानंतर शहर व जिल्ह्याच्या विविध भागातील, लष्करातील कुस्तीपटूंच्या आखाड्यात कुस्त्या झाल्या. काही कुस्त्यांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. पंच कमिटी, पक्ष, संघटना, मंडळे, संस्था व स्मृतिप्रीत्यर्थ लावलेल्या हजारो रुपये रोख बक्षिसांच्या कुस्त्यांनी कुस्त्यांच्या दंगलीत रंगत वाढविली. यावेळी पंचकमिटी पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कुस्तीपटूंना रोख बक्षीस, ढाल, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी पंचकमिटीचे पदाधिकारी, विविध पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कुस्तीप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पहिल्यांदाच युवती कुस्तीपटू आखाड्यात
श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या दंगलीत पहिल्यांदाच युवती कुस्तीपटू प्रज्ञा बिछय्या, शालिनी वाघ भगूर, वैष्णवी पालवे, अश्विनी गांभाळे पिंपळगाव घाडगाव, प्रियंका मांडवे चांदवड यांनी सहभागी होत आखाड्यामध्ये कुस्तीचे डावपेच दाखविले. पहिल्यांदाच कुस्तीच्या दंगलित युवती कुस्तीपटू सहभागी झाल्याने त्यांच्या लढतीप्रसंगी कुस्तीप्रेमी व ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.