..अन् जेलरोडला उसळली दंगल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:20 AM2021-09-09T04:20:32+5:302021-09-09T04:20:32+5:30
जेलरोड शिवाजी महाराज पुतळा चौकात बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास युवकांचा एक समूह रस्त्यावर घोषणा देत आंदोलन करून त्यांनी ...
जेलरोड शिवाजी महाराज पुतळा चौकात बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास युवकांचा एक समूह रस्त्यावर घोषणा देत आंदोलन करून त्यांनी टायर पेटवून दिले होते. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर संतप्त झालेल्या युवकांच्या समूहाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दंगा नियंत्रण पथक, वज्र वाहन, आंदोलकांवर पाण्याचा मारा करणारे वरुण वाहन, रुग्णवाहिकेचा लवाजमा घेऊन पोलीस फौजफाटा अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचला.
संतप्त झालेल्या समूहाला पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रारंभी अश्रुधुराचा मारा केला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत गोळीबार करून सर्वांना पिटाळून लावले. यावेळी दोघा जखमींना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दंगा नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करत समाजकंटकांवर दहशत बसण्यासाठी, शांतता व सुव्यवस्थेबाबत नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी हे प्रात्यक्षिक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
--इन्फो--
नागरिकांच्या काळजाचा चुकला ठोका
दंगल उसळली तर किती वेळेत पोलिसांचा प्रतिसाद मिळतो आणि दंगल नियंत्रणात आणण्यास यश येते, याचे प्रात्याक्षिक नाशिकरोड पोलिसांकडून करण्यात आले. जेलरोडला आलेला पोलिसांचा संपूर्ण तयारीनिशीचा ताफा बघून सुरुवातीला सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी जेलरोडला दंगल झाल्याची अफवा पसरली होती. परंतु गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी आजूबाजूचे रहिवासी व व्यावसायिक संकुलातून उपस्थित नागरिक, रहिवासी, ग्राहक सर्वजण या घटनेचे मोबाइलमधून चित्रीकरण करत होते.
080921\08nsk_43_08092021_13.jpg~080921\08nsk_44_08092021_13.jpg
दंगल नियंत्रण पोलिसांकडून~दंगल नियंत्रण पोलिसांकडून