मनमाडला पालिका कार्यालयावर चढून रिपाइंचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:02 PM2021-03-23T23:02:59+5:302021-03-24T00:36:25+5:30
मनमाड : शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून दुसरीकडे बेड शिल्लक नसल्याच्या समस्येने बाधित रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे मनमाड शहरात डीसीएचसी सेंटर सुरू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका कार्यालयावर चढून आगळे वेगळे आंदोलन केले.
मनमाड : शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून दुसरीकडे बेड शिल्लक नसल्याच्या समस्येने बाधित रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे मनमाड शहरात डीसीएचसी सेंटर सुरू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका कार्यालयावर चढून आगळे वेगळे आंदोलन केले.
सेंटर सुरू न झाल्यास आत्मदहनाचा इशारा यावेळी देण्यात आला. शहरामध्ये कोरोनाने उद्रेक केला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मनमाडमध्ये तीन दिवसीय कडकडीत जनता कर्फ्यू घोषित करून बंद पाळण्यात आला. मात्र रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली असल्याचे चित्र आहे. नांदगाव येथे ३० बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर उपलब्ध आहे मात्र नांदगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण संख्या पाहता ही सुविधादेखील अपुरी पडत आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने मालेगाव, नाशिक येथेही बेडची संख्या जवळ जवळ पूर्ण झालेली असल्याने बाहेरील रुग्ण उपचारासाठी आल्यास त्यांना बेड नसल्याचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो.
मालेगाव व नाशिक येथील स्थानिक रुग्णांना प्राधान्य दिले जात असल्याने मनमाड शहरातील रुग्णांची फरपट होत आहे. त्यामुळे मनमाड शहरात तत्काळ ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू करावे या मागणीसाठी आज पालिका कार्यालयाजवळ रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष तथा नगरसेवक गंगादादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी पालिका कार्यालयाच्या इमारतीवर चढून सिनेस्टाईल आंदोलन करत कोविड सेंटर करावे यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. कोविड सेंटर न झाल्यास आत्मदहनाचा इशारा मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
यावेळी नेते संजय कांबळे, शेखर आहिरे, पप्पू दराडे, सुशील खरे, अरुणा जाधव, नीलेश इंगळे, सुरेश शिंदे, फिरोज शेख, अकिल शेख, जावेद मन्सूरी, बादल राऊत, शैलेश जगताप, पी. आर. निळे, बाळासाहेब मोरे, महेंद्र वाघ, बाळासाहेब भोसले, विक्की छबरिया यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.