रिपाइंला चुन्याची डबी, ध्येयनाम्यात आठवलेंची छबी‘
By admin | Published: February 12, 2017 12:26 AM2017-02-12T00:26:05+5:302017-02-12T00:26:17+5:30
रामदासी’ भाजपा : मतांसाठी बेगमी
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या सतरा जागाही रिपाइंला न देता चुना लावणाऱ्या भाजपाने दलित मतांची बेगमी करण्यासाठी आपल्या ध्येयनाम्यात रामदास आठवले यांची छबी वापरली आहे. विशेष म्हणजे खुद्द आठवले यांनीच मुंबई महापालिका वगळता आपली छबी वापरू नये, असे आवाहन भाजपाला केले असताना नाशिकमध्ये मात्र दलित मतांसाठी रामदासी झालेल्या पक्षाने त्यांचे आवाहन धुडकावले आहे.
देशात आणि राज्यात भाजपा सरकारमध्ये रिपाइं आठवले गट सहभागी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाबरोबरच रामदास आठवले राहणार असे गृहीत धरले जात होते. त्यादृष्टीने तयारी सुरू होती. परंतु मुंबई महापालिका वगळता अन्यत्र भाजपा आणि रिपाइंचे सूत जमले नाही. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत १२२ अनुसूचित जातीच्या अठरा जागा, तर अनुसूचित जातीच्या नऊ जागा राखीव आहे. त्यातील १६ जागा रिपाइंचे स्थानिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी मागितल्या होत्या. रिपाइंने हा प्रस्ताव पाठविला तेव्हा भाजपात इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. त्यामुळे मुलाखती संपल्यानंतर चर्चा करू, असे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नंतर टाळाटाळ करीत दोन ते तीन जागा देण्याची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे सातपूर विभागात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यासाठी जागा सोडण्यासही नकार देण्यात आला. त्यामुळे रिपाइं आठवले गटाने भाजपाचा नाद सोडला. भाजपाने ‘चुना लावला नाही तर चुन्याची आख्खी डबीच रिपाइंच्या हातावर रिती केली’, अशी भावना या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आठवलेंचा दम;
तरीही म्हणे ‘हमदम’
विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या व्यतिरिक्त राज्यातील अन्य नऊ महापालिकांत भाजपा-रिपाइं युती नसल्याने आपले छायाचित्र वापरू नये, असे रामदास आठवले यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले असून, त्यांनी एकप्रकारे भाजपाला दमच भरला आहे. असे असताना भाजपाने रामदासांची आळवणी सुरू केली
आहे.
नाशिक रिपाइंची भूमिका अद्यापही अस्पष्ट त्यामुळे नाशिकमध्ये भाजपा आणि रिपाइं युती नसताना आता मात्र दलित मतांसाठी भाजपाला रामदास ‘आठवले’ आहेत. भाजपाने नाशिक महापालिकेसाठी शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या ध्येयनाम्यात रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची छबी वापरली आहे. त्यामुळे भाजपा काही प्रभागांमध्ये ‘राम-दास’ झाल्याचे जाणवत आहे.