येवला तालुक्याच्या तापमानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 09:47 PM2020-03-20T21:47:27+5:302020-03-21T00:32:55+5:30
मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ऊन आणि गारव्याचा खेळ आता संपला असून, तालुक्याच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत गेले आहे. वाढत्या उन्हाने वातावरणातील उष्माही वाढू लागला आहे.
येवला : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ऊन आणि गारव्याचा खेळ आता संपला असून, तालुक्याच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे.
तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत गेले आहे. वाढत्या उन्हाने वातावरणातील उष्माही वाढू लागला आहे. त्यामुळे मार्च अखेर वा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून येवलेकरांना उन्हाचा कहर सहन करावा लागणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून, घराबाहेर न पडण्याला पसंती दिली जात आहे. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दीही कमी झाली आहे.
वाढत्या उन्हामुळे रस्त्यावरील शुकशुकाट आणखी वाढत जाणार असून, शीतपेयांना मागणी वाढली आहे.
मार्चचा पहिला दिवसाचा अपवाद वगळता मागील वर्षी संपूर्ण महिना ‘हॉट’ राहिला होता. यावर्षी मात्र स्थिती पूर्णत: वेगळी असल्याचे चित्र होते; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा लहरी निसर्गाने आपले रूप बदलले असून, कमाल तापमानात वाढ होत असल्याचे हवामान निरीक्षक केंद्राच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. मंगळवारी (दि.१७) शहराचे कमाल तापमान ३५.८, तर किमान तापमान १७.४ अंश इतके नोंदविले गेले. मंगळवारी दिवसभर नागरिक घामाघूम झाले होते.