मेनरोड भागात पुन्हा वाढली वर्दळ, वाहनांच्या गर्दीत चालायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:49+5:302021-07-21T04:11:49+5:30
कोरोना निर्बंध शिथिल आता सारे काही सुरळीत होत असताना त्याच त्या समस्या पुन्हा पुढे येत असून त्यामुळे नागरी समस्यांमुळे ...
कोरोना निर्बंध शिथिल
आता सारे काही सुरळीत होत असताना त्याच त्या समस्या पुन्हा पुढे येत असून त्यामुळे नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ मेनरोडवर आहे. परंतु त्या ठिकाणी वाहतूक आणि गर्दीचे कोणतेही नियोजन झालेले नाही. सुतळीच्या तोड्यापासून सारे काही या बाजारपेठेत मिळत असल्याने शहरातीलच नागरिक नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिक या ठिकाणी येत असतात. मात्र, अरुंद रस्ता त्यातच फेरीवाल्यांची प्रचंड अतिक्रमणे यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. त्यातच या मार्गावर एक दुचाकी, रिक्षा किंवा अगदी कार जरी आली तर संपूर्ण भागात वाहतूक कोंडी होत असते. परिणामी, नागरिकांना चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
इन्फो...
लाखो लोकांची रोज ये-जा..
नाशिक शहराचीच नव्हे तर जिल्ह्याची ही मोठी मार्केट प्लेस आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक तर येथे येतातच परंतु त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी ये-जा करतात. लाखो लोक या मार्गावर आणि मध्यवर्ती बाजारपेठेत ये-जा करीत असतात. त्यामुळे हा भाग मध्यवर्ती असूनही कोणतेही नियोजन नाही.
इन्फो..
फुटपाथ कागदावरच
मेनरोडचा रस्ता मुळातच विकास आराखड्यात रुंद दर्शवण्यात आला आहे. मात्र, दुतर्फा जुन्या वाड्यातील बाजारपेठ असल्याने तेथे रुंदीकरण करणे शक्य नाही. परिणामी पादचाऱ्यांच्या सेायीसाठी फुटपाथ बांधण्याचे नियोजन असले तरी ते कागदावरच आहे.
इन्फो...
अतिक्रमण हटाव केवळ नावालाच
महापालिकेने फेरीवाला झोन तयार केले आहेत. मात्र मेनरोडवरील फेरीवाले हे मुळातच राजकीय नेत्यांशी संबंधित असून त्यामागे मोठे अर्थकारण असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे फेरीवाल्यांना हटवण्याची महापालिकेची हिम्मत होत नाही.
कोट...१
मेनरोडही खूप महत्त्वाची बाजारपेठ आहे. मात्र, येथील गर्दीचे कोणतेही नियोजन नाही. प्रचंड अतिक्रमणे आणि नंतर वाहनांना बंदी नसल्याने एखादी गाडी मध्ये आलीच तर चालणे कठीण होते. गाडगे महाराज चौक, धुमाळ चौक येथे तर नेहमीच वाहतूक कोंडी असते.
- राजू कुटे, डिंगरअळी
कोट..२
बाजारपेठेत प्रवेश करतानाच इतक्या अडचणी असतात की, नाशिककरांना मध्यवर्ती भागात चालणे कठीण होते. पादचाऱ्यांना सहज चालता यावे यासाठी आधी अतिक्रमणे हटवली पाहिजेत. त्यानंतर मोठ्या वाहनांना ंबंदी घातली पाहिजे.
- कल्याणी कुलकर्णी, गंगापूर रोड
कोट...
महापालिकेच्या वतीने बाजारपेठेतील फेरीवाल्यांची अतिक्रमणे वेळावेळी हटवली जातात. सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असल्याने गर्दी कमी वाढू लागली आहे. परंतु त्यावर नियोजन सुरू आहे.
- जयश्री सोनवणे, विभागीय अधिकारी, पश्चिम नाशिक