नदीकाठची शेती गेली वाहून
By Admin | Published: August 4, 2016 01:22 AM2016-08-04T01:22:56+5:302016-08-04T01:23:12+5:30
मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतात झाले पाण्याचे तळे
नाशिकरोड : दारणा नदीला आलेला पूर व पावसाचे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात साचल्याने नाशिक तालुक्याच्या पूर्व व आजुबाजुच्या गावातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पावसाची श्रावण पाळ सुरू राहाणार असल्याने दुबार पेरणी करता येणे शक्य नसुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
शहर व आजुबाजूच्या ग्रामीण भागात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाचे आगमन झाले. तसेच धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी, वालदेवी, दारणा या नद्यांना महापूर आला होता. यामुळे सर्वत्र शेतात पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते. तर नदीकाठच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पीक पेरणी वाहुन गेली.
नाशिक तालुक्याच्या पूर्व व आजुबाजुच्या भगूर, लहवित, दोनवाडे, नानेगाव, संसरी, बेलतगव्हाण, वडनेर, विहितगांव, चेहेडी, पळसे, जाखोरी या गावातील मळे विभागात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके सडून गेली आहेत. सर्वात जास्त नुकसान सोयाबीन व भाजीपाल्याच्या शेतीचे झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोथींबीर, शेपु, मेथी, मुळे या शेती मालाचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. नवीन उसाच्या लागवडीचे देखील नुकसान झाले आहे. बुधवारी शेतकरी व त्यांचे कुटुंबिय शेतात साचलेले पाणी मार्गस्थ करण्यासाठी दिवसभर राबत होते. आता पावसाची श्रावण पाळ सुरू होणार असल्याने दुबार पेरणी करणे देखील शक्य होणार नाही. शेती मालाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)