लोकवर्गणीतून औरंगाबाद रस्त्याची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:39 PM2018-10-01T17:39:58+5:302018-10-01T17:40:19+5:30
बोलठाण : आर्ट आॅफ लिव्हिंगच्या मदतीने ग्रामस्थांचा पुढाकार
नांदगाव : जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या बोलठाणसह तेरा गावांना जोडणाऱ्या औरंगाबाद रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन आर्ट आॅफ लिव्हिंगच्या सहकार्यातून बोलठाण ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी लोकवर्गणी काढून रस्त्याची डागडुजी केली.
नांदगाव तालुक्यातील पूर्व भाग असलेल्या कुसूमतेल, ढेकु खुर्द व बुद्रुक, वसंतनगर एक व दोन,चंदनपुरी, लोढरे, ठाकरवाडी, जातेगांव, बोलठाण, गोंडेगाव,जवळकी, रोहिले या तेरा गावांतील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी तसेच व्यापारी आणि शेतक-यांना मालाची खरेदी-विक्र करण्यासाठी औरंगाबाद शहर जवळ असुन ते सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद कडे जाण्यासाठीचा मार्ग शेजारील कन्नड तालुक्यातुन पाच किलोमीटर आणि उर्वरीत मार्ग वैजापूर तालुक्यातुन जातो. मात्र या पाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय स्थिती बनलेली आहे. रस्त्याचे डांबरीकरण वीस वर्षापूर्वी करण्यात आले होते. पुन्हा नुतनीकरण किंवा डागडुजी करण्यात आली नसल्याने रस्ता प्रचंड खराब होउन मोठ-मोठे खड्डे पडले होते. नाशिक व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्याच्या सीमारेषेवर हा भाग असल्याने सदर रस्त्याकडे औरंगाबाद जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हिंग आणि बोलठाण येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर नवले, सदस्य मच्छिंद्र पठाडे व पोलिस पाटील सोमनाथ खरोटे यांचेसह व्यापारी नेमीचंद ताथेड, विजय सोनी, गुलाबचंद गुगळे, प्रितेश नहार, योगेश गुगळे, संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गंडे,नानासाहेब नवले, जितेंद्र पाटणी यांनी वर्गणी जमा करून रस्त्यावर मुरु म, दगड जेसीबीच्या सहाय्याने डागडुजी केली.
गावक-यांचे श्रमदान
ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बव्हंशी रस्त्यांची साधी डागडुजीही केली जात नाही. त्यामुळे ह्या रस्त्यावरील वाहतूक जीवघेणी ठरत चालली आहे. परंतु, शासनाच्या भरवशावर अवलंबून न राहता गावक-यांनीच आर्ट आॅफ लिव्हिंगच्या मदतीने रस्ता डागडुजीचा मार्ग निवडला. या रस्ता दुरुस्तीसाठी गावक-यांनी स्वत: श्रमदान केले.