लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे भगूर-नानेगाव रस्ता होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:37 AM2019-05-22T00:37:05+5:302019-05-22T00:37:24+5:30
भगूर-नानेगाव रस्ता लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असल्याने खासदार हेमंत गोडसे, लष्कराचे अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत चर्चा केली.
देवळाली कॅम्प : भगूर-नानेगाव रस्ता लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असल्याने खासदार हेमंत
गोडसे, लष्कराचे अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत चर्चा केली. यावेळी नानेगावला जाण्या-येण्यासाठी नऊ मीटरचा रस्ता देण्याचे आश्वासन दिले.
भगूर-नानेगाव रस्त्यावर लष्कराकडून संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आल्याने नानेगावला जाणारा-येणारा रस्ता बंद होणार होता. याबाबत नानेगाव ग्रामस्थांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून रस्त्याची जागा सोडून संरक्षक भितींचे काम करावे, अशी मागणी केली होती.
याबाबत सोमवारी सकाळी ब्रिगेडियर पी. रमेश, खासदार हेमंत गोडसे, नानेगावचे ग्रामस्थ विलास आडके, अशोक आडके, पोलीस पाटील संदीप रोकडे, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रमोद आडके, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर आदींनी लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे ज्या ठिकाणी रस्ता बंद होणार आहे त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नानेगाव ग्रामस्थांची होणारी गैरसोय सांगण्यात आली.
याबाबत छावणी प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना ग्रामस्थांना देत लष्करी आस्थापना व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या.
शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांना इतर मार्गे जाण्यासाठी वाहनव्यवस्था नसल्याने होणारी अडचण दाखविण्यात आली. तसेच भगूरकडून पळसे गाव व साखर कारखान्याकडे जाणारा एकमेव रस्ता असल्याने दिवसभर रस्त्याने वर्दळ असते. नानेगाव रस्त्याची गरज व महत्त्व लष्करी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे लष्कर व रेल्वे या दोघांच्या हद्दीदरम्यान नऊ मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी सोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. घटनास्थळी भेट देऊन सर्व परिस्थिती बघितल्यानंतर ब्रिगेडियर रमेश यांनी नानेगावला येण्या-जाण्यासाठी नऊ मीटरचा रस्ता देण्याचे तोंडी आश्वासन दिले.