कळवण तालुक्यात रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:48 PM2018-09-14T23:48:50+5:302018-09-15T00:19:22+5:30
कळवण तालुक्यात प्रवास करताय ! जरा जपून !! तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय. ग्रामीण, इतर जिल्हा, प्रमुख जिल्हा, राज्य मार्गावरून वाहन चालवणे कठीण झालंय. मान-पाठीच्या कण्याप्रमाणेच वाहनांचे शॉकअॅपसर, टायर फुटू लागले आहेत. वाहनांचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील जनता त्रस्त झाली असून, रस्त्यांना वैतागली आहे.
कळवण : तालुक्यात प्रवास करताय ! जरा जपून !! तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय. ग्रामीण, इतर जिल्हा, प्रमुख जिल्हा, राज्य मार्गावरून वाहन चालवणे कठीण झालंय. मान-पाठीच्या कण्याप्रमाणेच वाहनांचे शॉकअॅपसर, टायर फुटू लागले आहेत. वाहनांचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील जनता त्रस्त झाली असून, रस्त्यांना वैतागली आहे.
कळवण तालुक्यात ग्रामीण व आदिवासी भागातून तालुक्याला जोडणारे तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक रस्त्यांवरील डांबर उखडून गेल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अशा रस्त्यांवरून प्रवास करताना सर्वसामान्य जनता वैतागली आहे. रस्त्यांची डागडुजी करूनही पुन्हा रस्ते ‘जैसे थे’ झाले आहेत. पुन्हा त्याच रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. मात्र यंत्रणेच्या गैरहजेरीत ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे अन् मजुरांच्या भरवशावर दुरुस्तीची कामे कितपत दर्जेदार होणार यात शंका आहे. मागील वर्षी ज्या रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे यंदा पुन्हा त्याच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यातील अनेक रस्त्यांची गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुरु स्ती न केल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेच्या समस्यांची सोडवणूक करत नाहीत, असा आरोप वाहनचालक व नागरिकांनी केला आहे.
कनाशी ते शृंगारवाडी रस्ता तर मृत्यूला आमंत्रण देणारा ठरू पाहत आहे. दळवट, जिरवाडा, शेपूपाडा, तताणी फाटा ते हतगड घाटापर्यंत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिरसमणी-साकोरे रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गाने होणारी शेतमाल वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता सुधारण्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. शिरसमणी ते साकोरे हा तीन किलोमीटरचा रस्ता असून, शिरसमणी, दह्याणे, कुंडाणे, भुसणी, ओतूर, जिरवाडे या गावातील शेतकरी आपला भाजीपाला व कांदा विक्रीसाठी वणी व नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन जाण्यासाठी मुख्यत: याच रस्त्याचा वापर करतात. भेंडी फाटा ते भेंडी या रस्त्याची अवस्था अशीच आहे. खडीकरण झाले; परंतु रस्त्यांच्या नशिबात डांबरीकरण नसल्याने रस्ता डांबरीकरण झालेला नाही म्हणून खडी डोके वर काढू लागली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनचालक व प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. परंतु या खराब रस्त्यांकडे लक्ष देण्यास संबंधित विभागाला वेळ मिळत नाही. आजच्या स्थितीत तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट आहे.