अखेर रस्ते ‘बजेट’ मध्ये!
By Admin | Published: December 29, 2015 10:55 PM2015-12-29T22:55:22+5:302015-12-29T23:06:53+5:30
महापौरांचा हिरवा कंदील : आर्थिक तरतूद मात्र गुलदस्त्यात
नाशिक : रखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अखेरीस मंगळवारी महापौरांनी हिरवा कंदील दिला. अंदाजपत्रकाच्या ठरावावर स्वाक्षरी केल्याने नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रस्त्यांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव अंदाजपत्रकात समाविष्ट केला असला तरी त्यासाठी निधी कोठून आणणार हे गुलदस्त्यात असून महापौरांनी मात्र बुधवारी त्याची उकल करू असे स्पष्ट केले आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक सध्या गडगडले आहे. त्यातच नवनवीन सूचना त्यात समाविष्ट केल्या जात असल्याने ही कामे कशी होणार असा प्रश्न आहे. आयुक्तांनी स्थायी समितीला १ हजार ४३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्याला आकार देताना स्थायी समिती सदस्यांनी अनेक कामे आणि योजना सुचवून बजेट फुगवले. सुमारे तीनशे ते सव्वा तीनशे कोटी रुपयांच्या वाढीमुळे अंदाजपत्रक १ हजार ७६९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. महासभेवर हे अंदाजपत्रक आले तेव्हा अखेरचे वर्ष म्हणजे इलेक्शन इयर असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामे उपसूचनेद्वारे घुसवून त्याचा पाऊस पाडला. दरम्यानच्या काळात सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचा सर्वांना खुश करणारा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. रस्त्यांचे डांबरीकरण हा सर्व नगरसेवकांच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्यासाठी निधीची ओढाताण होत होती. महासभेच्या ठरावात या रस्त्यांच्या तरतुदीचा समावेश असेल किंवा नाही याविषयी नगरसेवकांची उत्सुकता शिगेला ताणली गेली होती.