साकोरेत झाड कोसळल्यामुळे रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 PM2021-05-29T16:14:43+5:302021-05-29T16:56:06+5:30
कळवण : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नाशिक रस्त्यावरील साकोरे गावाजवळ विजेच्या खांबावर झाड पडले. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प झाली होती.
कळवण : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नाशिक रस्त्यावरील साकोरे गावाजवळ विजेच्या खांबावर झाड पडले. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प झाली होती.
रस्त्यावर झाड पडल्यामुळे कळवण व नाशिक रस्त्यावर दुतर्फा वाहने अडकून पडली. रस्ता बंद असल्यामुळे पोकलॅन्डच्या सहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला करण्यात साकोरे ग्रामस्थांना यश आले.
कळवण शहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारी पावणेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक सकल भागांत पाणी साचले. शहरातील मेन रोड रस्त्याचे काम सध्या संथगतीने चालू आहे. रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदकाम, गटार खोदकाम केलेले आहे. तेथे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. तर तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
शेमळीत वीजपुरवठा खंडित
जुनी शेमळी : येथील परिसरात सायंकाळी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांची धावपळ उडाली. पावसामुळे गावातील श्रीराम मंदिरासमोरील वृक्ष उन्मळून पडल्यामुळे विद्युत खांबावरील तारा तुटल्या. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. बाहेर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला. आंब्याचीही मोठ्या प्रमाणात गळती झाली. वादळी वाऱ्यामुळे सटाणा, मालेगाव रस्त्यावरही वृक्ष उन्मळून पडले.