बाऱ्हे घाटात रस्ता खचला; दुरुस्ती सुरू
By admin | Published: August 8, 2016 12:12 AM2016-08-08T00:12:01+5:302016-08-08T00:12:27+5:30
बाऱ्हे घाटात रस्ता खचला; दुरुस्ती सुरू
दिंडोरी : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ननाशीसह परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ननाशी ते बाऱ्हे रस्त्यावर ननाशी नजीक घाटात एका अवघड वळणावर साइडपट्टी व रस्ता पावसामुळे खचला आहे. या ठिकाणी रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणी रस्ता देखील अरु ंद आहे वाहनांच्या दृष्टीने हे वळण धोकेदायक बनले आहे.
पावसाळ्यात या घाटात मोठ्या प्रमाणावर धुके येत असते. रात्रीच्य वेळी एखाद्या मोठया व अवजड वाहनाच्या चालकाला रस्त्यावरील भगदाड लक्षात आले नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. ज्या बाजूने रस्ता खचला आहे तेथे खाली अंदाजे ५० ते ७५ फूट खोल दरी आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास कळविल्यानंतर उपअभियंता शेखर मराठे अभियंता अर्जुन गोसावी यांनी भेट देत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
ननाशीसह परिसरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे परिसरातील सर्व पाझर तलाव, वळण बंधारे, नदी- नाले ओव्हरफ्लो झाले आहेत.
तलावांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या परिसरात भात, नागली, वरई आदी पिकांच्या लावणीची कामे वेगात सुरु असतांना मुसळधार पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी लावणी केलेले भात पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. नागली, वरईची रोपे देखील पुरात वाहून गेली आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांची भात, नागली, वरई इत्यादि महत्त्वाची पिके असतात. या पिकांच्या उत्पादनावर आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ठरते. याच पिकांना पावसाचा जबर फटका बसल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान या आपत्कालीन परिस्थितीत कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदि प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)