इगतपुरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:23 PM2020-02-01T23:23:50+5:302020-02-02T00:10:28+5:30
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, मणक्याच्या त्रासामुळे वैतागले आहेत. दररोज होणाऱ्या दुचाकी वाहनांच्या नुकसानीमुळे सदर रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
इगतपुरी : शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, मणक्याच्या त्रासामुळे वैतागले आहेत. दररोज होणाऱ्या दुचाकी वाहनांच्या नुकसानीमुळे सदर रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
जुना मुंबई-आग्रा महामार्ग रस्ता गेल्या चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने १७ कोटी रु पये खर्च करून सीमेंट काँक्रि टीकरण करून तयार केला, मात्र यंदाच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुचाकीसह वाहनांचे नुकसान होत असून, अनेक वाहनचालकांना मणक्याचे आजार झाले असून, नाशिकला खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. या रस्त्यावर अर्धा ते एक फूट खड्डे पडल्याने ते वाचविण्याच्या नादात छोटे अपघातही सुरूच असून, अद्यापही डागडुजीचे काम न केल्याने संबंधित विभागावर नागरिकांचा रोष वाढला आहे.
सर्वच रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडून रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढत वाहनचालकांना जावे लागत असल्याने रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी समोर येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होतात, पण यंदा मात्र पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली असून ते जीवघेणे ठरत आहेत. शहरातील गिरणारे ते महिंद्रा कंपनीपर्यंत रस्ता खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्नदेखील भेडसावतो आहे. काही दुचाकीस्वार पडून जखमी होण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.