पंधरा वर्षांपासून रस्ता तयार; वाहतुकीस खुला होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:13 AM2019-12-03T01:13:00+5:302019-12-03T01:13:48+5:30
रविशंकर मार्गावरील वडाळागावातील मनपा रुग्णालय ते श्रीराम कॉलनी रस्ता अर्धवट स्थितीत पडून असल्याने अपघातांचे केंद्र झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
इंदिरानगर : रविशंकर मार्गावरील वडाळागावातील मनपा रुग्णालय ते श्रीराम कॉलनी रस्ता अर्धवट स्थितीत पडून असल्याने अपघातांचे केंद्र झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पुणे महामार्ग व मुंबई महामार्ग जवळचा रस्ता म्हणून शंभर फुटी रस्ता तयार करण्यात आला. राजीवनगर झोपडपट्टी, राजे छत्रपती चौक, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्र मांक एकमार्गे रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांमुळे आणि दोन महामार्गास जोडण्याचा जवळचा रस्ता असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु तेव्हापासून वडाळा गावातील महापालिका रुग्णालय ते श्रीराम कॉलनी हा शंभर फुटी रस्ता जमीन अद्याप ताब्यात न घेतल्यामुळे अर्धवट स्थितीत पडून आहे. त्यामुळे रस्ता पन्नास फूट तयार करण्यात आला असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यातूनच श्रीराम कॉलनीसमोर समोरासमोर वाहनांचे लहान-मोठे अपघात घडत आहेत. तसेच हमरीतुमरी होऊन हाणामारीच्या घटना घडत आहेत. जीवितहानीची वाट न बघतात तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाने रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.