अंधारल्या वाटेवर, उजेड थोडा पेरूया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:10 AM2018-10-15T00:10:40+5:302018-10-15T00:12:52+5:30
अंधत्व ही भारतातील प्रमुख समस्या असून, सुमारे ५५ लाख बांधव दृष्टिहीन आहेत. अशा अंध बांधवांना गतिशील राहण्यासाठी मार्गदर्शक असलेले मुख्य साधन म्हणजे पांढरी काठी होय. १५ आॅक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला जागतिक दृष्टिदिन असेही म्हटले जाते.
नाशिक : अंधत्व ही भारतातील प्रमुख समस्या असून, सुमारे ५५ लाख बांधव दृष्टिहीन आहेत. अशा अंध बांधवांना गतिशील राहण्यासाठी मार्गदर्शक असलेले मुख्य साधन म्हणजे पांढरी काठी होय. १५ आॅक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला जागतिक दृष्टिदिन असेही म्हटले जाते.
अंधत्व निवारण्यासाठी काही दूरगामी उपाय करणे आवश्यक असतानाच जे अंध बांधव आहे, त्यासाठी सेवा भावी कार्य मोठ्या प्रमाणावर होण्याची गरज आहे. नाशिकमधील नॅबसारख्या काही सामाजिक संस्थांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
आपल्या डोळ्यात बारीकसा केस किंवा धुलीकण गेला तरी आपण रडवले होतो. परंतु जेथे जन्मापासूनच दृष्टी नाही? त्यांच्या जीवनातील अंध:काराची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. जीवनात अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा डोळा हा अवयव नसतानाही सर्वसामान्य माणसाप्रमाणे किंबहुना त्यांच्याही पेक्षा अधिक जिद्दीने आलेल्या संकटावर मात करीत अनेक अंध मुले-मुली आणि अंध बांधव भगिनी यशाकडे वाटचाल करीत आहेत. त्यांना जगण्याची उमेद आणि नवे बळ देण्याचे कार्य करणाऱ्या त्यात दि नॅशनल असोशिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र (नॅब) या संस्थेचे प्रेरणादायी कार्य सुरू आहे. कारण नॅब ही संस्था गेल्या साडेतीन दशकापासून महाराष्ट्रातील अंध बांधवांच्या जीवनात उजेड पेरण्याचे कार्य करीत आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय सातपूर औद्योगिक वसाहतीत असून, राज्यभरात १८ जिल्ह्यामध्ये शाखा आहेत. त्याशिवाय अन्य जिल्ह्यामध्ये अंधासाठी कार्य करणाºया सेवाभावी संस्थेलादेखील मदत देण्यात येते. संस्थेमार्फत अंध मुलीसाठी निवासी शाळा सुरू करण्यात आली असून, बहुविकलांग मुला-मुलांची शिक्षणाची येथे सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अंध, अपंग मुलांसाठी ‘सेन्सरी गार्डन’ तयार करण्यात आले असून, या मुलांना शिकविण्यासाठी विशेष अध्यापन कॉलेजची सुविधा आहे. यात डी.एड; बी.एड. कोर्सचा समावेश असून अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे शिक्षण घेऊन ‘विशेष’ मुलांसाठी सेवाभावी कार्य करण्यासाठी तयार होत आहेत, अशी माहिती नॅब युनिटचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दिली. अंध बांधवांच्या संस्थेच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन अनेकदा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
पांढरी काठीचा उपयोग
पांढरी काठी हा अंध बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. पूर्वी साधी लाकडी काठी होती. परंतु सदर व्यक्ती अंध आहे हे सर्वांना समजावे म्हणून पांढरी काठीचा वापर सुरू झाला. त्यानंतर फोल्डिंगच्या काठ्या आल्या. आता ‘स्मार्ट टेन’ म्हणजे सेन्सर असलेली काठी आली असून, त्याचे मूल्य तीन हजार रुपयांपर्यंत असल्याने सर्वच अंध बांधवांना अशी काठी घेणे शक्य होत नाही. मात्र कोणत्याही पांढºया काठीच्या सहाय्याने अंध व्यक्ती रस्त्यावरून सहजपणे विनाआधार चालू शकते.
नको दयेचा आधार, हवा हक्काचा वावर
अंध बांधवांना जगण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु या अडचणीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे कुणाच्या दयेवर जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये दिसून येते. म्हणून अनेक अंध बांधव समाजात नोकरी, व्यवसाय करताना तर दिसतातच त्याचबरोबर उच्च अधिकारी पदावरदेखील पोहचलेले आहे. अंध बांधवांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. महापालिकेचा राखीव निधी आहे. परंतु तीदेखील खर्च करण्यात येत नाही अशी खंत अनेक अंध समाजबांधवांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविली.